PM Modi France and UAE Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रान्समधील सर्वोच्च नागरी सन्मान ‘लिजन ऑफ ऑनर’ प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. जगभरातील काही निवडक व्यक्तींनाच हा सन्मान देण्यात आला आहे. यापूर्वी ज्या लोकांना हा सन्मान देण्यात आला, त्यात संयुक्त राष्ट्रांचे माजी महासचिव बुट्रोस-घाली, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला, वेल्सचे तत्कालीन प्रिन्स किंग चार्ल्स आणि जर्मनीच्या माजी चान्सलर अँजेला मर्केल यांचा समावेश आहे.
तत्पूर्वी, फ्रान्समध्ये पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत करण्यात आले. फ्रान्सला पोहोचल्यावर पंतप्रधान एलिझाबेथ बोर्न यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. येथे पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला आणि दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवण्यात आले.
बॅस्टिल डे परेडमध्ये सहभाग –
पंतप्रधान मोदी आज फ्रान्समधील बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या खास निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी यात सहभागी होण्यासाठी आले आहेत. बॅस्टिल डे सोहळ्याला ते विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. बॅस्टिल डे फ्रान्ससाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. फ्रेंच राज्यक्रांतीच्या एका मोठ्या घटनेच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. दरवर्षी 14 जुलै रोजी साजरा केला जाणारा बॅस्टिल डे हा फ्रान्सचा राष्ट्रीय दिवस म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी फ्रान्समध्ये सामूहिक सुट्टी असते आणि संपूर्ण देशात उत्सवाचे वातावरण असते.