हिंजवडी, दि. 15 – पिंपरी-चिंचवडमध्ये राहणारे थेरगावमधील आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंगपटू जयदेव म्हमाने यांच्या गेल्या तीस वर्षांतील क्रीडा कारकिर्दीची खुद्द पंतप्रधानांनी दखल घेतली. नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या नरेंद्र मोदींनी म्हमाने यांच्यासह अन्य खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक करीत त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.
मागील आठवड्यात मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांना सायंकाळी सात वाजता भेटण्यासाठीचे म्हमाने यांना पीएमओ कार्यालयाकडून आमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्यासह अन्य तिघांना भेटीची परवानगी मिळाली असल्याने नॅशनल किकबॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशनचे सचिव बापूसाहेब घुले, रेफ्री प्रमोद चिंचवडे या सर्वांशी मोदींनी संवाद साधला. त्यांच्या खेळाची व पदकांची माहिती घेतली.
म्हमाने यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पटकाविलेल्या पदकांची पंतप्रधानांनी उत्सुकतेने पाहणी केली. यापुढे देशाकरिता खेळाडूंची नवी सक्षम पिढी घडविण्याची जबाबदारी घेण्याची सूचना “पीएमओ’ कार्यालयातील अधिकाऱ्यांना केली. तसेच खेळाडूंसाठी ट्रेनिंग सेंटर उभे करण्यासाठी “पीएमओ’ कार्यालयाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
जयदेव म्हमाने यांची कारकीर्द
जयदेव म्हमाने यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये 21 देशांतील विविध स्पर्धांत व विशेष करून ज्यामध्ये एशियन चॅम्पियनशिप, वर्ल्ड चॅम्पियनशिप व इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा मुख्यत्वे वर्ल्ड कंबाट गेम आणि एशियन इनडोअर अँड मार्शल आर्टस गेम्स, किकबॉक्सिंग, कराटे, बेल्ट रेसलिंग, मास रेसलिंग, केम्पो, पॅंक्रेशन या विविध क्रीडा प्रकारात सहभाग घेऊन देशाकरीता असंख्य सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली आहे. त्यांच्या या कामगिरीचे मेल पीएमओ कार्यालयात पोचले होते. त्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यासाठी पंतप्रधानांनी या खेळाडूंना खास वेळ दिली होती.
देशाच्या पंतप्रधानांना भेटण्याचा अविस्मरणीय क्षण होता. भेटताच मोदीजींनी काढलेले पहिले उद्गार आताही कानात सतत ऐकू येतात. ते म्हणजे, या पहिलवान आत या, काय कसे काय बरय नां? त्यांचे मराठीतील शब्द ऐकून काय बोलावे समजतय नव्हते. दुसरे म्हणजे त्यांनी मला विचारले की किती तास सरवा करता. मी सांगितले सकाळी तीन तास व रात्री तीन तास. मग ते म्हणाले वाह मी तर तुमच्यासारखी किक नाही मारू शकत! मोदींची भेट ही माझ्यासाठी अतिशय सुखद व अविस्मरणीय आठवण राहील.
– जयदेव म्हमाने, आंतराष्ट्रीय किक बॉक्सिंग पटू.