पिंपरी, दि. 15 – पिंपरी-चिंचवड महापालिकेला वीजपुरवठा खंडित होण्याचे ग्रहण लागले आहे. त्यात मोरेवस्ती, कुदळवाडी, चिखली आदी परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. मंगळवारी (दि. 14) पुन्हा रात्रभर वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचा रात्रीस खेळ चाले अशी चर्चा परिसरात रंगली होती.
मोरेवस्तीमधील अष्टविनायक चौक परिसरातील स्वामी विवेकानंद सोसायटी, संगम हौसिंग सोसायटी, सुयोग सोसायटी, गणेश सोसायटी, श्री साई हौसिंग सोसायटी आदी सोसायट्यांमधील लाइट मंगळवारी सायंकाळी 7 वाजता गेली. ती रात्रभर आली नाही. मागील तीन दिवसांपूर्वी देखील याच परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांना रात्री अकरावाजता विचारणा केली तर केबल जळाली असून दुरुस्त करण्यासाठी कर्मचारी पाठविले आहेत. काही वेळात लाइट येईल, असे सांगण्यात आले. परंतु मोरेवस्तीतील काही सोसायट्यांची लाइट पहाटे तीनच्या दरम्यान आली तर काही सोसायट्यांना चक्क सकाळी सात नंतर वीजपुरवठा सुरळीत झाला. म्हणजे तब्बल 12 तास वीजपुरवठा खंडित राहिला. सातत्याने केबल नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे महावितरणने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी महावितरणचे कवडे आणि भोसले या अधिकाऱ्यांना फोन केला असता उचलला नाही.
महावितरणकडे कारणांचा पाऊस
मोरेवस्ती परिसरात पावसाळ्यात सातत्याने केबलच्या जोडमध्ये पाणी जाऊन वीजपुरवठा खंडित होत होता. पावसाळ्यातच काही भागात रस्ता डांबरीकरण, ड्रेनेजलाइनसाठी खोदाई केल्याने वीजपुरवठा खंडित झाला. अशी उत्तरे महावितरणचे कर्मचारी देत होते. तर पुढे जाऊन केबल जुन्या झाल्या आहेत. आणि वीज लोड वाढल्याने केबल नादुरुस्त होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे. तर कधी मेनलाइनचा जम्प तुटल्याने, फीडर अशी अनेक कारणे देत दोन तीन दिवसाला वीजपुरवठा खंडित होत आहे. महावितरणच्या अशा भोंगळ कारभारला चिखलीकर वैतागले आहेत. महावितरण लाइट बिल ग्राहकांनी भरण्यासाठी तत्परता दाखविते त्यातुलनेत सेवा देण्यात दाखवित नसल्याने नागरिकांच्या मनात महावितरणच्या कामकाजाविषयी रोष आहे.