PM Narendra Modi – अयोध्येतील अनेक योजनांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत होते. यावेळी येथील एक दलित मीरा मांझी यांच्याशी मोदींची भेट झाली आणि मोदींनी मांझी यांच्या घरी जाऊनही चहाही घेतला.
मीरा मांझी या पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या १० कोटीव्या लाभार्थी ठरल्या आहेत. मीरा यांच्या घरी पंतप्रधान काही वेळ थांबले. त्यांच्या कुटुंबीयांशी त्यांनी चर्चा केली आणि चहाचाही आस्वाद घेतला.
तत्पूर्वी अयोध्येत पंतप्रधानांचा ८ किमी लांब रोड शो झाला. नंतर त्यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाच्या नव्या इमारतीचे उदघाटन केले. त्याच वेळी २ अमृत भारत आणि ६ वंदे भारत गाड्यांना त्यांनी हिरवा झेंडा दाखवला.
आज सकाळी अयोध्या विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधानांचा रोड शो सुरू झाला. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती आणि मोदींवर यावेळी पुष्पवर्षावही करण्यात आला.
इकबाल अंसारी यांनी केले स्वागत…
रामजन्मभूमी खटल्यात बाबरी मशिदीचे पक्षकार हाशिम अंसारी यांचे पुत्र इकबाल अंसारी यांनीही यावेळी पंतप्रधानांचे फुलांनी स्वागत केले. हिंदू- मुस्लिम सगळे एकत्र राहतात आणि परस्परांच्या कार्यक्रमात सगळे सहभागी होतात असा संदेश अयोध्या सगळ्यांना देते आहे असे अंसारी यावेळी म्हणाले.
याबाबतची विशेष गोष्ट अशी अयोध्येच्या संदर्भात न्यायालयात प्रदीर्घ काळ चाललेल्या लढ्यात इकबाल अंसारीही एक पक्षकार होते. राम मंदिरासाठी जमीन देण्यास त्यांचा विरोध होता. त्यासाठी ते न्यायालयीन लढाई लढत होते. मात्र आज त्यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
२०२० मध्ये पंतप्रधान जेंव्हा मंदिराच्या भूमीपुजनासाठी अयोध्येला आले होते त्यावेळीही इकबाल अंसारी यांनी त्यांचे स्वागत केले होते. राम मंदिर निर्माण ट्रस्टकडून प्राण प्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण इकबाल यांना देण्यात आले आहे.