पुणे– पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करून जनतेला समर्पित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 1 ऑगस्ट रोजी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. पंतप्रधान यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सकाळी 11.45 वाजता प्रदान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रोला हिरवा कंदील दाखवून विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प-2ला हिरवा झेंडा दाखवून नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रो टप्पा-1च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत मेट्रो रूट असणार आहे. या प्रकल्पाची पायाभरणी 2016मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजीनगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणांना जोडणार आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीजनिर्मिती केली जाईल. सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरित करण्यात येणार आहेत.
पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरेदेखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. यासोबतच, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेद्वारे बांधण्यात येणाऱ्या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी 1 ऑगस्ट रोजी असल्याने, लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधानांना प्रदान केला जाणार आहे.
पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. या पूर्वी या मानाचे पुरस्कार प्राप्त करणारे, डॉ. शंकरदयाल शर्मा, प्रणव मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन. आर. नारायण मूर्ती, डॉ. श्रीधरन या मान्यवरांचा समावेश आहे.
- पुणे मेट्रोच्या पूर्ण झालेल्या विभागाचे करणार लोकार्पण
- पिंपरी-चिंचवड येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरांचे हस्तांतरण
- कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या संयंत्राचेही उद्घाटन