पिंपरी – पिंपरी परिसरातील यशवंत डोंगरे टोळी, तळेगाव दाभाडे परिसरातील सुधीर परदेशी टोळी आणि भोसरी परिसरातील सौरभ मोतीरावे या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी तीन टोळ्यांवर ही कारवाई झाल्याने शहर परिसरातील गुन्हेगारांची चांगलीच तंतरली आहे.
पिंपरीतील टोळी प्रमुख यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे (वय 22), सुशांत उर्फ दगडी आण्णा अनिल जाधव (वय 19), आकाश रंजन कदम (वय 21), शुभम कैलास हजारे (वय 25), सुशांत उर्फ भैया आजिनाथ लष्करे (वय 22), मयूर प्रकाश परब (वय 22), कृष्णा धोंडीराम शिंदे (वय 25, सर्व रा. पिंपरी), अजिंक्य अरुण टाकळकर (वय 21, रा. मोशी) या टोळीवर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
तळेगाव दाभाडे परिसरातील टोळी प्रमुख सुधीर अनिल परदेशी (वय 25, रा. वडगाव मावळ), विवेक नंदकिशोर लाहोटी (वय 42, रा. शाहूनगर), प्रतीक्षा विक्रांत भोईर (वय 29, रा. वडगाव मावळ), शरद मुरलीधर साळवी (वय 30, रा. काळेवाडी), भाऊ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या टोळीवर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भोसरीतील टोळी प्रमुख सौरभ संतुराम मोतीरावे (वय 20, रा. आळंदी), आकाश गोविंद शर्मा (वय 22, रा. भोसरी), राम सुनील पुजारी (वय 21, रा. मोशी), ओमकार मल्हारी दळवी (रा. दिघी) या टोळीवर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
या तिन्ही टोळ्यांमधील आरोपींवर पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी, कोपरगाव पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दुखापत करून जबरी चोरी करणे, पुरावा नष्ट करणे, दुखापत करणे, घरात घुसून मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे, गाड्यांची, सामानाची तोडफोड व जाळपोळ करून नुकसान करणे, दहशत निर्माण करणे, दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणे असे गुन्हे दाखल आहेत.