पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील बहुतांश रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. परंतु चिखली, मोरेवस्ती, सोनवणे वस्ती, पाटीलनगर आदी भागातील रस्त्यांवर खड्डे पडून अपघात घडत होते परंतु याकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत होते. याबाबतचे वृत्त दै. प्रभातने रविवारी (दि. 30) “उद्योगनगरीतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य’ या मथळ्याखाली प्रसिद्ध करताच महापालिकेने चिखली परिसरातील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेतली आहे.
चिखली परिसरातील सोनवणे वस्ती, देहू-आळंदी मार्ग, चिखली आकुर्डी मार्ग तसेच मोरेवस्तीमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना व वाहनचालकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी खड्ड्यांमध्ये दुचाकींना लहान मोठे अपघात घडले आहेत. सोनवणे वस्ती येथील गुरुकुल शिक्षण संस्थेजवळ तर भर पावसात दोन तासामध्ये चार वाहनचालकांना अपघात घडले होते. याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करताच महापालिकेच्या वतीने चिखली परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.
महापालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी
स्थानिक नागरिक आणि माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, माजी नगरसेविका साधना मळेकर, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र यादव, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने यांनी वारंवार रस्त्यातील खड्डे बुजविण्याबाबत तक्रारी केल्या होत्या. तसेच दै. प्रभातचे वृत्त प्रसिद्ध होताच रविवारी (दि. 30) महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह शहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, फ क्षेत्रीय कार्यालयाचे स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे, उप अभियंता विजय वाईकर, कनिष्ठ अभियंता प्रतीक भसारकर यांनी पाहणी केली.
रविवारी आम्ही चिखली परिसरातील रस्त्यांची पाहणी केली. या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. पुढील आठ दिवसांत काम पूर्ण होईल. तसेच काही रस्त्यांचे डांबरीकरण पावसाळा संपताच करण्यात येईल.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.