नवी दिल्ली – टोकियोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जपानच्या व्यापार क्षेत्रातील धुरीणांबरोबर भरवलेल्या व्यापार गोलमेज परिषदेचे अध्यक्षस्थान भूषविले. जपानच्या 34 कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या परिषदेत सहभागी झाले होते. यापैकी बहुतांश कंपन्यांनी भारतात गुंतवणूक केली असून, त्यांचा कारभारही भारतात चालतो. वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, अर्धवाहक, पोलाद, तंत्रज्ञान, व्यापार, बॅंकिंग आणि वित्तपुरवठा अशा विविध क्षेत्रांमध्ये या कंपन्या काम करतात.
भारतातील आणि जपानमधील व्यापारविषयक महत्त्वाच्या संस्था- जसे- केडॅन्रन, जेट्रो म्हणजेच जपानी परकीय व्यापार संघटना, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य संस्था, जपान आंतरराष्ट्रीय सहकार्य बॅंक, जपान-भारत व्यापार सल्ला समिती आणि इन्व्हेस्ट इंडिया- या संस्थाही यात सहभागी झाल्या होत्या. भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार आहेत, यावर भर देत पंतप्रधानांनी ‘भारत-जपान संबंधांच्या सुप्त सामर्थ्याचे सदिच्छादूत’ म्हणून, व्यापार-उदीम करणाऱ्या समुदायाचा गौरव केला.
मार्च 2022 मध्ये जपानचे पंतप्रधान किशिदा भारतभेटीवर आले असताना, आगामी पाच वर्षांत 5 लाख कोटी येन इतकी गुंतवणूक करण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट उभय देशांनी ठरवले होते, असे पंतप्रधान म्हणाले.आर्थिक संबंधांमध्ये नुकत्याच घडलेल्या घडामोडी पंतप्रधानांनी अधोरेखित केल्या. यांमध्ये, भारत जपान औद्योगिक स्पर्धात्मकता भागीदारी, स्वच्छ ऊर्जा भागीदारी, यांसह अन्य बाबींचा समावेश आहे. पायाभूत सेवांच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय नलिका, उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन योजना, आणि अर्धवाहकांविषयीचे धोरण यांबद्दल पंतप्रधान बोलले. भारतातील बळकट आणि व्यापक स्टार्टअप इकोसिस्टिम त्यांनी अधोरेखित केली.
भारतात 84 अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक
जागतिक पातळीवर थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ मंदावला असूनही भारताने मात्र गेल्या वित्तीय वर्षात 84 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी विक्रमी थेट परकीय गुंतवणूक मिळवली आहे. भारताच्या आर्थिक क्षमतेबद्दल जगाकडून मिळालेले हे विश्वासमतच म्हटले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. जपानी कंपन्यांनी भारतात अधिक सहभागी होऊन ‘जपान सप्ताहाच्या’ रूपाने भारताच्या विकासयात्रेत योगदान द्यावे, असे निमंत्रणही त्यांनी दिले.