पुणे – मुलांच्या गटात राजस्थान संघाने महाराष्ट्र संघाला तर मुलींच्या गटात उत्तर प्रदेश संघाने छत्तीसगड संघाला पराभूत करताना भारतीय रोलबॉल संघटना, महाराष्ट्र रोलबॉल संघटना व पुणे जिल्हा रोलबॉल संघटना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वरिष्ठ गटाच्या 18 व्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
एकोणीसाव्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचा समारोप बालेवाडी स्टेडियम येथे झाला. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले. ह्या खेळाचे जनक राजू दाभाडे, संयोजन समितीचे अध्यक्ष व महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, डॉ. इंदरप्रकाश नेगी, रोल बॉल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरकांत, खासदार आणि छत्तीसगड रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष विजय बघेल, पुणे जिल्हा अध्यक्ष गजानन थरकुडे, साईचे सचिव एस. एस. रॉय, उद्योगपती मोतीशेठ सांकला, सनी सांकला, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुलांच्या गटाच्या अंतिम लढतीत राजस्थान संघाने महाराष्ट्र संघाला 6-2 असे पराभूत करतना स्पर्धेचे विजेतेपद मिळवले. मुलींच्या गटातील अंतिम लढतीत उत्तर प्रदेश संघाने छत्तीसगड संघाला 4-3 पराभूत करताना विजेतेपद पटकावले.
मुलांच्या गटात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये आरएसएसए संघाने गुजरात संघाला 8-4 असे पराभूत केले. मुलींच्या गटाच्या तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीत राजस्थान संघाने महाराष्ट्र संघाला 3-1 असे पराभूत केले.