“साहेब तेवढी माझी हातगाडी मिळवून द्या’

परिस्थितीने ग्रासलेल्या महिलेची मदतीसाठी सह धर्मादाय आयुक्‍तांकडे धाव

पुणे – घरी कर्ता पुरूष नाही. मिळेल ते काम करून गाठीशी राहिलेल्या पैशातून पोटाची खळगी भरायची की, कर्करोगावर उपचार घ्यायचे. अशा द्वीधा परिस्थितीत मानसिक संतूलन बिघडत चालले, पण जगण्याची जिद्द सोडली नाही. त्यामुळे “साहेब पैसे नको, काम करण्यासाठी एक हातगाडी मिळवून द्या’, “मी काम करून पैसे कमवीन’ या महिलेने केलेल्या विनंतीवर सह धर्मादाय आयुक्‍तांनी महिलेची भावना लक्षात घेऊन तिला मदतीचा हात दिला. एवढच नव्हे तर तिचे समुपदेशन करून मानसिक परिस्थिती सुधारण्यास मदत केली.

धर्मादाय आयुक्‍त कार्यालय म्हणजे केवळ खटले चालविणे एवढ्यावरच न थांबता गरीब असहाय्य रुग्णांना मोफत किंवा अल्पदरात उपचार मिळवून देणे, दुष्काळ परिस्थितीत शेतकरी आणि पशुपालकांच्या मदतीला धावणे, चारा छावण्या सुरू करणे, पाण्याची व्यवस्था करणे यासह शिक्षणासाठी अर्थसहाय्य करणे आणि व्यवसायाला मदत करून नागरिकांना “न्याय’ देण्याचे काम करत आहे. त्याचीच प्रचीती नुकतीच पुणे धर्मादाय आयुक्‍त कार्यालयात आली.

निलिमा (नाव बदलेले आहे) ही महिला पुण्यात तिची आई आणि बहिणीसह रहाते. घरात कर्ता पुरूष नसल्यामुळे हातगाडी चालवून दररोज मिळेल त्या पैशातून पोटाची खळगी भरायची. मात्र, कर्करोगाचा आजार झाल्यामुळे रुग्णालयात उपचार घेण्याइतके पैसेही नाही. त्यामुळे रुग्णालयांकडून उपचार नाकारला जातो. अखेर निलिमाने थेट धर्मादाय आयुक्‍त कार्यालय गाठले आणि सह धर्मादाय आयुक्‍त दिलीप देशमुख यांना भेटण्याची विनंती केली.

तिचे बोलणे आणि वागण्यावरून महिलेचे मानसिक संतुलन बिघडल्याचे निदर्शनास आले. त्याबाबत डॉक्‍टरांशी संपर्क साधून उपचार करण्यास सांगितले. उपचार सुरू झाले मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी जी हातगाडी सुरू होती, ती महापालिकेने उचलून नेली. त्यामुळे “साहेब तेवढी माझी हातगाडी मिळवून दिली तर मी काम करून पैसे कमवेल’ असे महिलेने सांगितले. त्यावेळी साहेबांनीही माणूसीकीच्या नात्याने तिला मदत केली. एवढच नव्हे तर तिचे समूपदेशनही केले.

संबंधित महिलेला कर्करोगाचा आजार असून, पैसे नसल्यामुळे रुग्णालयात उपचार मिळत नव्हते. त्यावेळी रुग्णालयाला सांगून उपचार सुरू केले. परंतु, त्यानंतर त्या महिलेने पैसे न मागता कामासाठी एक हातगाडी द्या, असे म्हटल्यामुळे तिला ही मदत देण्यात आली. तसेच तिच्या घरासाठी दानशूर व्यक्‍तींच्या मदतीने मदत करण्यात आली.
– दिलीप देशमुख, सह धर्मादाय आयुक्‍त, पुणे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.