ग्रामपंचायत इमारतीचे रखडलेले काम सुरू
काऱ्हाटी (वार्ताहर) – “काऱ्हाटी ग्रामपंचायत कार्यालयाचे काम रखडले’ या मथळ्याखाली दैनिक प्रभातच्या वृत्ताची बारामती सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेत या कामास गती दिली आहे.
काऱ्हाटी येथील ग्रामपंचायत इमारत मोडकळीस आली होती. त्यामुळे नवीन इमारत मंजूर करण्यात आली. मात्र गेल्या दोन वर्षांपासून इमारतीचे काम अर्धवट असून ते रखडले आहे. ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीसाठी 2015-2016 मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत दहा लाख रुपये मंजूर झाले व 2016-2017मध्ये जिल्हा परिषद निधी अंतर्गत 10 लाख रुपये मंजूर झाले. त्यापैकी पहिल्या टप्प्यातले काम कॉलम उभे करून स्लॅब टाकण्यात आली.
मात्र, त्यापुढील काम थांबवण्यात आले आहे. तर याबाबत ग्रामपंचायतीने जिल्हा परिषद बारामती बांधकाम विभाग, पंचायत समिती बांधकाम विभाग यांच्याशी वेळोवेळी पाठपुरावा करून कागदपत्रे सादर केली. तरी काम मार्गी लागत नसल्याने ग्रामपंचायतीचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी जोर धरत होती. व नागरिकांनी “प्रभात’कडे गाऱ्हाणे मांडली होती. “प्रभात’मध्ये ग्रामपंचायतीच्या रखडलेल्या कामाबद्दल वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर बांधकाम विभाग प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर ग्रामपंचायतीचे रखडलेले काम तातडीने हाती घेण्यात आले.
दैनिक “प्रभात’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा केला व अधिकाऱ्यांनी सहमती दर्शवत तातडीने काम सुरू केले, त्याबद्दल दैनिक “प्रभात’चे आभार मानतो.
– बी. के. जाधव, सरपंच, काऱ्हाटी ग्रामपंचयत
ग्रामपंचायत कामात मुदत वाढीमुळे दिरंगाई झाली होती; परंतु आता काम सुरू करण्यात आले आहे व ते लवकरच पूर्ण करून देण्याची जबाबदारी घेतली असल्याने काम लवकर पूर्ण होईल.
– आर. ए. जाफरी, शाखा अधिकारी, बांधकाम विभाग, पं. स. बारामती