नवी दिल्ली – करोनाची चाचणीही खर्चिक असते. मात्र, भारतीय संशोधकांनी एका साध्या आणि स्वस्त कागदाद्वारे करोनाची चाचणी घेण्याचे तंत्र विकसित केले आहे.
प्रख्यात काल्पनिक हेर फेलुदा याच्या नावावरून या चाचणीचे नावही फेलुदा ठेवण्यात आले आहे. या चाचणीची किंमत अवघी पाचशे रुपये असून एका तासात करोनाची लागण झाली आहे की नाही याचा निष्कर्ष त्याद्वारे काढता येणार आहे.
फेलुदाच्या किटचे उत्पादन टाटा कंपनीकडून केले जाणार असल्याचे बोलले जात असून कागदावर आधारित चाचणी घेतली जाण्याचा हा पहिला प्रयोग असणार आहे.
याबाबत एका वाहिनीशी बोलताना प्रा. विजय राघवन म्हणाले की, हा अत्यंत सुरक्षित आणि मोठ्या प्रमाणावर केल्या जाणाऱ्या चाचण्यांसाठी उपयुक्त ठरणारा प्रकार आहे.
दिल्लीतील इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अँड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजीच्या संशोधकांनी फेलुदाचे तंत्र विकसित केले आहे. खासगी प्रयोगशाळेत या तंत्राची दोन हजार जणांवर चाचणी घेण्यात आली आहे. यात ज्यांना करोनाची लागण झाली आहे, त्यांचाही समावेश होता.