पुणे आयुक्‍तालयाजवळच बिल्डरची हत्या

दहा दिवसांत सहा खून : पोलीस आयुक्‍तांना गुन्हेगारांची सलामी

पुणे – पोलीस आयुक्‍तालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्रेझरी कार्यालयाच्या दरवाजातच एका बांधकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. गाडीत बसण्याच्या तयारीत असतानाच त्याच्यावर पिस्तूलमधून गोळ्या झाडल्या. एक गोळी थेट छातीत घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे ही घटना बंडगार्डन पोलीस ठाण्यालगतच झाली. यामुळे परिसरात खळबळ माजली होती.

राजेश कनाबार (63, रा. सोपानबाग, घोरपडी) असे मृत बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. हत्या घडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सह पोलीस आयुक्‍त रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्‍त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त(दक्षिण विभाग) संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे आदी उपस्थित होते.

पोलिसांनी तातडीने गुन्हे शाखा व बंडगार्डन पोलीस ठाण्याची पथके तयार करुन संशयितांच्या मागावर पाठवली. दरम्यान महत्वाचे धागेदोरे हाती लागल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश कनाबार हे बांधकाम व्यवसायीक आहेत. त्यांचा बावधान येथील दहा एकर जागेसंदर्भात काही जणांसोबत वाद सुरु होता. याची सुनावणी आज जिल्हाधिकारी कार्यालयात होती. त्यासाठी ते आले होते.

सुनावणी झाल्यावर दुपारी पावणेतीनच्या सुमारास ते ट्रेझरी कार्यालयाच्या दरवाजातून बाहेर पडले. तेथे त्यांचा वाहनचालक कार घेऊन थांबला होता. कारमध्ये बसण्याआधी त्यांनी रस्त्यावर थांबलेल्या फळविक्रेत्याकडून फळे विकत घेतली. यानंतर ते पिशवी घेऊन गाडीत बसत असतानाच अचानक एक व्यक्ती तेथे दाखल झाला. त्याने काही कळायच्या आतच राजेश यांच्यावर पिस्तूलातून गोळी झाडली. ते खाली पडताच त्याने लष्कर परिसराच्या दिशेने पळ काढला.

कारचालकाने तातडीने कारमधून उतरुन राजेश यांना जखमी अवस्थेत कारमध्ये बसवले. त्यांना तातडीने जहॉंगीर रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना मृत घोषित केले. ही हत्या संबंधित जागेच्या वादातून झाल्याची शक्‍यता लक्षात घेऊन पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरु केला. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार हत्या करणारा एकच व्यक्ती होता. प्रत्यक्षात जागेवर एक काडतुसाची पुंगळी सापडली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.