गुरुदासपूर (पंजाब) – पिटबुल जातीच्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात 13 वर्षांचा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. मुलाच्या वडीलाने जीवाच्या आकांताने प्रयत्न करून मुलाला या हल्ल्यातून वाचवले. गुरूदासपूर जिल्ह्यातील कोटलीभानसिंग या खेडेगावात ही घटना घडली.
मुलगा वडिलांच्या मागे बसून मोटारसायकलवरून जात होता. त्याचवेळी मालकाच्या ताब्यातील पिटबुल जातीचा कुत्रा भुंकू लागला. कुत्रा भुंकत असतानाच चुकून मालकाच्या हातून त्याचा पट्टा सुटला आणि कुत्र्याने मोटारसायकलवर बसलेल्या मुलावर हल्ला केला. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आता त्याची प्रकृती स्थिर आहे.
मागील महिन्यात लखनौच्या कैसरबाग परिसरात राहणाऱ्या 82 वर्षांच्या निवृत्त शिक्षिका सुशीला त्रिपाठी यांच्यावर गेल्या महिन्यात त्यांच्या पिटबुल जातीच्या पाळीव कुत्र्याने हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्रिपाठी यांच्या जिम ट्रेनर असणाऱ्या मुलाने ३ वर्षांपूर्वी पिटबुल जातीचा कुत्रा घरी आणला होता. १२ जुलै रोजी मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता 82 वर्षांच्या सुशीला त्यांच्या लाडक्या पिटबुलला नेहमीप्रमाणे टेरेसवर फिरवत होत्या. पिटबुलच्या गळ्यात बांधलेली साखळी उघडताच त्याने सुशीला यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला इतका भयंकर होता की, कुत्र्याने त्यांच्या पोटाचे, डोक्याचे आणि चेहऱ्याचे एकूण 12 लचके तोडले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र अतिरक्तस्त्रावामुळे त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यानंतर त्यांच्या मुलाने तो पाळीव कुत्रा लखनौ महानगरपालिकेच्या ताब्यात दिला. आता महापालिकेने कुत्र्याच्या वर्तनाचा अभ्यास करून सगळ्या चाचण्या घेऊन तो कुत्रा त्रिपाठी यांच्याच एका परिचितांना दत्तक दिला आहे.
पिटबुल हा जगातील सर्वात धोकादायक कुत्रा मानला जातो. त्याचे वर्तन हिंसक आणि आक्रमक असते. जगभरात पिटबुल जातीचे कुत्रे माणसांवर सर्वाधिक जीवघेणे हल्ले करतात असे आकडेवारीवरून दिसून आले आहे. या जातीचा कुत्रा पाळायचा असेल तर मालकाने योग्य प्रशिक्षण घेणे आवश्यक असते. अमेरिकेत 2015 या एका वर्षांत पिटबुलच्या हल्ल्यात 28 नागरिकांना जीव गमवावा लागला. जगातील अनेक देशांमध्ये पिटबुल जातीचे कुत्रे पाळण्यावर बंदी आहे.
पिटबुल टेरियरची वैशिष्ट्ये –
* रुंद, सपाट डोके. अतिशय तीक्ष्ण क्षमता असलेले कान. अतिशय हुशार जातीचा कुत्रा म्हणून ओळख.
*सशक्त, पिळदार शरीर. वेगाने धावण्यास अनुकूल शरीररचना. त्यांचा आकार मोठा असला तरी चांगली झेप घेतात. 16 ते 30 किलो वजन
*रुंद आणि शक्तीशाली जबडा, लढाऊ अशी ओळख
* मालकाला खुश करण्याची वृत्ती, त्यामुळे मालकाशी निष्ठावान, नव्या गोष्टी शिकण्याची वृत्ती
अमेरिकेत 2005 ते 2017 या कालावधीत कुत्र्यांनी जे माणसांवर जीवघेणे हल्ले केले त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 284 हल्ले पिटबुल जातीच्या कुत्र्यांकडून झाले होते. त्यापाठोपाठ रॉटवेलरकडून 45, जर्मन शेफर्डकडून 20, मिक्स्ड ब्रीडकडून 17, अमेरिकन बुलडॉगकडून 15 असे प्रमाण आहे.
अमेरिकेतील एकूण कुत्र्यांच्या संख्येत पिटबुलचे प्रमाण फक्त 6.5 टक्के आहे. तरीही 12 वर्षांच्या काळात या जातीच्या कुत्र्यांकडून तब्बल 284 जणांची जीव घेतला गेला आहे.