वॉशिंग्टन : मानवाने अंतराळात मोठ्या प्रमाणावर संशोधन करून प्रगती केली असली आणि अनेक प्रश्नांची उत्तरे शोधली असली तरी समुद्राखालील संशोधन अद्यापही बाकी आहे. त्यामुळे समुद्राच्या पोटात दडलेल्या अनेक गूढ घटनांचे उत्तर शोधण्यात मानवाला अपयश आले आहे.
अटलांटिक समुद्रात समुद्राच्या तळाशी एका रेषेत अनेक छिद्रे दिसत असून या छिद्रामागील नक्की कारण शोधण्यात अद्यापही शास्त्रज्ञांना अपयश आले आहे. समुद्रात तळाशी तब्बल दहा किलोमीटर लांब अशी ही छिद्रांची रांग पसरली असून ही छिद्रे कशामुळे तयार झाली आहे त्याबाबत अद्याप कोणतेही उत्तर शास्त्रज्ञांना सापडले नाही,
एक छिद्र साधारण चार इंच व्यासाचे असून एका रेषेत ही सर्व छिद्रे आहेत अठरा वर्षांपूर्वीही संशोधकांना अशी छिद्रे आढळली होती पण अद्यापही या मागील कारण शोधण्यात त्यांना यश आलेले नाही. समुद्राच्या पोटात अनेक घटना घडत असून त्याची माहिती अद्यापही मानवाला नाही अशी कबुली आता शास्त्रज्ञांनी दिली आहे. अठरा वर्षांपूर्वी जेव्हा शास्त्रज्ञांना अशी छिद्रे दिसली होती तशाच प्रकारची छिद्रे आता 23 जुलैला पुन्हा एकदा शास्त्रज्ञांचा नजरेस आली आहेत.
नॅशनल ओशनिक अँड ऍटमॉसफेरिक ऍडमिनिस्ट्रेशन या संस्थेने याबाबतची माहिती आपल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. सर्वसाधारणपणे ज्या प्रदेशात ज्वालामुखी आहेत आणि भूकंपाचे प्रमाण जास्त आहे त्या प्रदेशाला लागून असलेल्या समुद्राच्या तळाशी अशा प्रकारची छिद्रे दिसण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.