- पोलिसांचा प्रतिसाद मिळणार आणखी जलद
पिंपरी – पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केल्यावर सात ते 10 मिनिटांमध्ये प्रतिसाद मिळत होता. आता हा प्रतिसाद आणखी जलद होणार आहे. कारण पोलीस आयुक्तालयासाठी 27 दुचाकी तसेच 21 चारचाकी वाहने उपलब्ध झाली आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस खात्याच्या आधुनिकीकरणावर भर दिला. नागरिकांच्या मनात पोलिसांची प्रतिमा कशी आणखी चांगली करता येईल, यावर भर दिला. पोलिसांचे आरोग्य चांगले राहावे आणि गल्लीबोळातून गस्त घालता यावी, यासाठी पोलिसांना सायकल देण्यात आल्या आहेत. मात्र, आयुक्तालयाकडे वाहनांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे वाहन खरेदीसाठी निधीची मागणी केली. त्यानुसार उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या अनुदानातून दोन कोटी रुपये वाहन खरेदीसाठी देण्यात आले.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार परिवहन विभागाचे पोलीस निरीक्षक अबरार सय्यद यांनी वाहनांची आवश्यकता असल्याबाबतचे पत्र तयार करून राज्याच्या गृहविभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानंतर 21 चारचाकी वाहने व 27 दुचाकी खरेदी करण्यात आल्या. ही वाहने पोलीस ठाणे, शाखा, डायल 112 या हेल्पलाइनसाठी वाटप करण्यात आले आहेत. यामुळे भविष्यातील पोलिसांचा प्रतिसाद आणखी जलद होणार आहे.