पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध 10 ठिकाणी करोनाची चाचणी करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील दहा ठिकाणाची निवड करण्यात आली आहे. नागरिकांना याठिकाणी जाऊन करोनाची रॅपिट अँटीजेन टेस्ट करता येणार आहे.
संभाजीनगर येथील आरटीटीसी सेंटर, बीएसएनल कार्यालय येथे सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत चाचणी केली जाणार आहे. चिंचवडगाव येथील तालेरा रुग्णालयात सकाळी साडेनऊ ते सायंकाळी 5 यावेळेत केंद्र सुरू असणार आहे. वायसीएम रुग्णालय सकाळी 8 ते रात्री 8, बालभवन खऱाळवाडी येथे सकाळी 9 ते दुपारी साडेतीन या वेळेत चाचणी केली जाणार आहे. जुने जिजामाता रुग्णालय येथे सकाळी 8 ते रात्री 8, भोसरी रुग्णालय सकाळी 9 ते दुपारी 3, यमुनानगर रुग्णालय सकाळी 8 ते 8, म्हेत्रेवस्ती दवाखाना येथे सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत चाचणी करण्यात येणार आहे. तर खिंवसरा पाटील थेरगाव रुग्णालयात सकाळी 9 ते दुपारी 4 व पिंपळे गुरव येथील बॅटमिंटन हॉल येथे सकाळी साडेनऊ ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत करोनाची चाचणी करण्यात येणार आहे.
शहरातील नागरिकांनी काही लक्षणे दिसल्यावर तसेच बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यास याठिकाणी तात्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.