- उपचाराधीन रुग्णांची संख्या 7 हजारांवर
- नवीन रुग्णसंख्याही घटतेय
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यापाठोपाठ शहरातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. शनिवारी 5374 रुग्ण बरे झाले असल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 34 हजार 392 इतकी झाली आहे. तसेच 24 तासांतील रुग्णसंख्याही घटली आहे. त्यामुळे शहरवासियांना दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस शहरामधील करोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली. एप्रिल महिन्यामध्ये करोनाने सर्वच रेकॉर्ड तोडत रुग्णसंख्येचा उच्चांक केला. शहरामध्ये दिवसाला 3 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत होती. तर मृतांची संख्याही शंभरीजवळ जाऊन पोहचली होती. शहरातील रुग्णांमध्ये भर पडत असतानाच गंभीर रुग्णांमध्येही वाढ होत होती. त्यामुळे शहरातील वैद्यकीय यंत्रणेवर मोठा ताण आला होता. शहरातील नागरिकांना रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर यासाठी मोठी धावपळ करावी लागली. मात्र, मे महिन्यांच्या मध्यापासून शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. आज शहरात नवीन 641 करोनाबाधिताची नोंद झाली आहे. तर तब्बल 5374 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत शहरातील 2 लाख 46 हजार 54 जणांना करोनाची लागण झाली आहे.
महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, शनिवारी (दि. 22) शहरात 641 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 45 हजार 413 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 42 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 28 व शहराबाहेरील 14 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरातील व शहराबाहेरील 5800 करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरात 7358 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 4448 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 3352 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 7800 इतकी आहे.
होम क्वॉरंटाइन रुग्णांची संख्या तीन हजारांवर
शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. लक्षणे तीव्र नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवून त्यांच्यावर उपचार केले जातात. एप्रिल महिन्यामध्ये घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 20 हजारांच्या जवळ गेली होती. तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही 10 हजारांवर पोहचली होती. गेल्या आठड्यापासून करोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. आज गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या अवघी 3352 इतकी आहे.
जिल्हा रुग्णालयात करोनाने एकाचा मृत्यू ; 7 बाधित
सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. 22) करोनाने एकाचा मृत्यू झाला. तर, 7 रुग्ण करोनाबाधित आढळले आहेत. मारुंजी येथील 50 वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना 18 तारखेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. नवी सांगवी, पिंपळे गुरव, औंध, थेरगाव, पिंपळे निलख, अंबड येथील रुग्ण हे बाधित आढळले आहेत. त्यामध्ये 4 पुरुष आणि 3 महिला रुग्णांचा समावेश आहे. रुग्णालयातून आज 6 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बावधन, लोणीकंद, पिंपळे गुरव, औंध, धनकवडी येथील रुग्णांचा त्यामध्ये समावेश आहे. रुग्णालयात सध्या 56 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 35 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णालयातून आतापर्यंत एकूण 1 हजार 652 जण बरे होऊन घरी परतले आहेत. 2 हजार 14 रुग्ण सध्या गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.