पिंपरी-चिंचवड : अपंग भवनाचे काम संथगतीने

पदाधिकाऱ्यांची स्थळपाहणी : काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मोरवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या चार मजली भव्य अपंग भवनाचे काम संथ गतीने सुरू आहे. ही बाब प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी महापालिका पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर तत्काळ याठिकाणी भेट देत हे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचे आदेश महापौर राहुल जाधव आणि स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी यांनी ठेकेदाराला दिले आहेत.

येत्या जागतिक अपंग दिनानिमित्त या भवनाचे उद्‌घाटन करण्याचा मानस यावेळी करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अपंग बांधवांची संख्या लक्षात घेऊन, याठिकाणी अपंग भवन उभारावे, अशी शहरातील अपंग बांधवांची आग्रही मागणी होती. त्यानुसार मोरवाडी चौकातील सेंट्रल मॉलमागे भूखंड राखीव ठेवण्यात आलाआहे. आता या भवनाचे काम सुरू करण्यात आले असून, त्याकरिता 18 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे.

“अपंग भवनाच्या उभारणीमुळे शहरातील अपंग बांधवांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हे भवन अपंग बांधवांसाठी महत्वाचे आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याची बाब महापालिका पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
-राजेंदे वाकचौरे ,उपाध्यक्ष, प्रहार अपंग क्रांती आंदोलन ,पिंपरी-चिंचवड शहर

हे काम वर्षभरापुर्वी सुरू करण्यात आले आहे. मात्र, या पाया खोदण्यासाठीच वर्षभराचा कालावधी गेला आहे. त्यामुळे राजेंद्र वाकचौरे यांनी ही बाब महापालिका पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महापौर राहुल जाधव, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे यांनी याठिकाणी भेट दिली.

या भेटीदरम्यान, या इमारतीसाठी पाया खोदताना टणक जमीन लागत नसल्याने, या बांधकामाला विलंब झाल्याची बाब ठेकेदाराने पदाधिकाऱ्यांच्या सांगितली. त्यावर अतिरिक्‍त मनुष्यबळ लावून हे काम पूर्ण करा. तसेच येत्या 3 डिसेंबर रोजी असलेल्या जागतिक अपंग दिनानिमित्त या भवनाचे उद्‌घाटन करण्याचे नियोजन असून, त्यापुर्वी हे काम पूर्ण करण्याचे आदेश या पदाधिकाऱ्यांनी दिले.

अपंग भवनाची वैशिष्ठ्ये

– चार मजली भव्य इमारत
-18 हजार चौरस फूटांचे बांधकाम
-अंदाजपत्रकात 18 कोटींची तरतूद
-अपंगांसाठी सर्व थेरपी उपलब्ध असणार आहेत.
– जागितक अपंग दिनी उद्‌घाटनाचे नियोजन

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.