पिंपरी -शहरात करोनाचा प्रादुर्भाव कायम असताना म्युकरमायकोसिसचे नवे रुग्ण सापडलेले नाही. तसेच, या आजारातून 266 रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहेत. सध्या ही साथ नियंत्रणात आली आहे. त्यामुळे शहरवासियांना म्युकरमायकोसिसपासून सध्या सुटका मिळाली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून शहरात करोना रुग्णसंख्येचा चढता-उतरता आलेख राहिला आहे. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर म्युकरमायकोसिसचे नवे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाली. महापालिका वैद्यकीय विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, शहरात आत्तापर्यंत म्युकरमायकोसिसचे एकूण 301 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 221 रुग्णांवर विविध प्रकारचे वैद्यकीय उपचार करण्यात आले. तर, 80 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
त्यामध्ये जबडा, डोळ्यावरील शस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे. म्युकरमायकोसिसचे उपचार करून 266 रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेलेले आहेत. म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 88.37 टक्के इतके राहिले आहे. तर, 35 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेदरम्यान म्युकरमायकोसिसचा आजार आल्याने भीतीदायक चित्र निर्माण झाले होते. या आजारात रुग्णांना जबडा व डोळ्यांवर शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या करोनाचे रुग्ण सापडत असले तरी म्युकरमायकोसिसचा एकही नवा रुग्ण न आढळल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.