काटेवाडी -ढेकळेवाडी 35 फाटा (ता. बारामती) येथील शेतामध्ये गवे दिसल्याने परिसरामध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे. या गव्यांचा बंदोबस्त वन विभागाने करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. ढेकळवाडी 35 फाटा येथील शेतकरी अंकुश रामचंद्र ठोंबरे यांच्या उसाच्या शेताच्या कडेला आज (सोमवारी) सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान दोन गवे दिसून आले.
पहिल्यांदा अंकुश ठोंबरे यांना शेतामध्ये म्हशी आल्या असतील, असे वाटले; परंतु खात्री केली असता त्यांच्या लक्षात आले की, या म्हशी नसून जंगली गवे आहेत. यामुळे ढेकळवाडी 35 फाटा परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गव्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान होणार असल्याने तातडीने अशा जंगली गव्यांचा बंदोबस्त वनविभागाने करावा.
सध्या ढेकळवाडी 35 फाटा येथे अंकुश ठोंबरे यांच्या शेतामध्ये हे दोन गवे दिसून आले आहेत. परंतु अजूनही इतर परिसरामध्ये किती गवे असतील याचा अंदाज लागू शकत नसल्याने सध्यातरी हे गवे दिसल्याने शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याची भीती वाटू लागली आहे. त्यामुळे वन विभागाने या जंगली गव्यांचे शेतातील वास्तव्य लक्षात घेऊन व याचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या जंगली गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केले आहे.
या अगोदर काटेवाडी, कन्हेरी परिसरामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला होता. या घटनेमुळे या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्या बिबट्यांचा बंदोबस्त वनविभागाने केला आहे. परंतु आता पुन्हा एकदा गवे या जंगली प्राण्याचे दिसण्याने या परिसरामध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.