पिंपरी – गुन्हेगारांच्या स्थानिक टोळ्यांमधील वर्चस्ववादातून 15 दिवसांपूर्वी एका तरुणावर खुनी हल्ला झाला होता. याचाच बदला घेण्यासाठी आक्या बॉन्ड टोळीच्या सदस्याचा खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 29) रात्री घरकुल चिखली येथे घडली.
अनिकेत प्रकाश रणदिवे (वय 20, रा. घरकूल, चिखली) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पिल्या गायकवाड, आशुतोष कदम, अजय चव्हाण आणि त्यांचे तीन ते चार अनोळखी साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मयत अनिकेत याचे वडील प्रकाश महादू रणदिवे (वय 44) यांनी याबाबत चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजय चव्हाण याला ताब्यात घेतले आहे.
घरकुल परिसरात आक्या बॉन्ड आणि अमित चव्हाण या दोघांच्या टोळ्या आहेत. परिसरातील वर्चस्व वादातून या टोळ्यांमध्ये नेहमी भांडणे होत असतात. टोळीच्या वर्चस्ववादातून १५ मे रोजी अमित चव्हाण याच्यावर नऊ जणांनी घरकूल परिसरात खुनी हल्ला केला.
अमित चव्हाण टोळीने या खुनी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आक्या बॉन्ड याचा मित्र अनिकेत रणदिवे यांच्यावर शुक्रवारी रात्री कोयता, चॉपरने हल्ला करण्यात आला. तसेच त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टूही मारण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अनिकेत याला पिंपरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.