सायकलवरून दररोज 64 कि.मी.चा प्रवास

कामशेत – इंधनाच्या वारंवार वाढणाऱ्या किंमती तसेच वाढत्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी व प्रदूषण या सर्वांचा सामना करत रोज दुचाकीवरून प्रवास करण्यापेक्षा आपण पर्यावरण पूरक प्रवास करून स्वत:चे आरोग्य सुदृढ राखले पाहिजे, हा विचार करून कामशेत पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी संतोष आनंदा दोरके हे काळेवाडी (पिंपरी) ते कामशेतचा दैनंदिन प्रवास सायकलवरून करीत आहेत.

संतोष दोरके (वय 39) यांचे मित्र लॉंगरूट सायकलींसाठी जात असतात. मात्र संतोष दोरके हे पोलीस खात्यात काम करत असल्याने त्यांना लॉंग रूट सायकलींसाठी जाण्यास जमत नव्हते, यामुळे त्यांची नेहमीच घुसमट व्हायची तसेच पोलीस कर्मचारी असल्याने अतिरिक्‍त कामाच्या व्यापात त्यांना व्यायामासाठी देखील वेळ मिळत नसल्याने वजन वाढणे यांसारख्या अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यास सुरवात झाली होती.

दोन वर्षांपूर्वी दोरके हे लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असतान तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील हे लोणावळ्याला आल्यानंतर त्यांच्या फिटनेसकडे पाहून दोरके प्रेरित झाले. दैनंदिन बिझी शेड्युअलमधून आरोग्यासाठी कसा वेळ देता येईल, याचे मार्गदर्शन लाभल्याने दोरके यांनी 2017 पासून आपला घरापासून ते पोलीस ठाण्यापर्यंतचा दैनंदिन प्रवास सायकलवरून करायचे त्यांनी ठरवलं, त्यावेळी ते लोणावळा शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने काळेवाडी ते लोणावळा हा रोजचा 45 किलोमीटरचा प्रवास दे सायकलवरून करत होते. म्हणजेच ये-जा मिळून 90 किलोमीटर, मागील कामही महिन्यांपासून दोरके हे कामशेत पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने आता काळेवाडी ते कामशेत हा 32 किलोमीटरचा प्रवास ते सायकलवरून करत आहेत.

दोन्ही बाजूने 64 किलोमीटर अंतराचा प्रवास दोरके सायकलवरून करीत असल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. रोज सायकलिंग केल्याने ते अनेक आजारांपासून दूर आहेतच तसेच ते एक फिट पोलीस कर्मचारी असल्याने पोलीस ठाण्यातील अन्य कर्मचाऱ्यांमध्ये देखील आता फिटनेसची स्पर्धा दोरके यांच्यामुळे सुरू झालेली पाहायला मिळते आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.