वृक्षांना जगवण्यासाठी सलाईनने पाणी

आरटीओ कार्यालय रस्त्यावर संतनगर मित्रमंडळाचा उपक्रम

पिंपरी – दिवसेंदिवस वाढतच जाणारा पारा जगभराची चिंता वाढवत आहे. वृक्षांची कमी होणारी संख्या या समस्येचे मुख्य कारण आहे. वृक्षारोपणासोबतच जे वृक्ष आहेत त्यांचे सवंर्धन अत्यावश्‍यक झाले आहे. या रणरणत्या उन्हाळ्यात वृक्षांना पाणी मिळणे अशक्‍य वाटत असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मोशी येथील आरटीओ कार्यालयाजवळच्या रस्त्यावर महापालिकेतर्फे लावण्यात आलेल्या वृक्षांना सलाईनच्या नळीने ठिबक सिंचन पद्धतीने पाणी पुरवठा केला जात आहे.

पिंपरी-चिंचवड येथील संतनगर मित्रमंडळ वृक्ष संगोपन करण्यासाठी झटत असून यासाठी त्यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. वृक्षांना लागेल तितके पाणी पुरवले जावे व पाण्याचा अपव्यय होवू नये यावर उपाय म्हणून रुग्णालयातील वापरलेल्या सलाईनला पाण्याने भरुन वृक्षाच्या मुळासी थेंब-थेंब पाणी सोडले जात आहे. वाढणाऱ्या तापमानाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षलागवड करुनच नाही तर त्यांचे संगोपन करने गरजेचे असल्याने वृक्षांना जगविली पाहिजेत यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

महापालिकेकडून रस्त्याकडील झाडांना टॅंकरने पाणी दिल्याने बऱ्याच पाण्याचा उपयोग वृक्षांना होत नाही. यामुळे पाण्याचा उपयोग कमी आणि पाण्याची नासाडी जास्त होते. यावर उपाय म्हणून सलाईनच्या नळीने थेंब-थेंब पाणी देण्याची शक्कल लढवण्यात आल्याचे वृक्षप्रेमींनी सांगितले आहे.

उन्हाळ्यात वृक्षांना पाईप किंवा झारीने पाणी घातले तरी ते कमीच पडते. उन्हाच्या झळांमुळे पाणी सुकून जाते. बाटलीला सलाईनची नळी बसवून ठिबक सिंचनाव्दारे पाणी पुरवठा केल्याने 80 टक्के पाण्याची बचत होते. तर, फक्‍त 20 टक्के पाण्यावर झाडे तग धरु शकतात.

संतनगर मित्र मंडळाकडून गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असून चांगल्या प्रकारे झाडांचे सर्वंधन केले जात आहे. आत्तापर्यंत 200 वृक्षांना सलाईन लावण्यात आले आहेत. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी यांचा लक्षणीय सहभाग आहे.

वृक्षांना लावलेल्या सलाईनच्या बाटलीत सकाळी फिरण्यास जातांना पाण्याची एक बाटली घेवून ती सलाईनची नळी लावलेल्या बाटलीत ओतली जाते. त्यामुळे ठिबक सिंचनाव्दारे झाडांना रोज पाणी मिळते यामुळे दुपारच्या वेळी सुद्धा रणरणत्या उन्हात देखील झाडे टवटवीत राहतात. एक किंवा दीड लिटर पाण्याची बाटली असेल तर ती आठ ते दहा तास चालते. ठिबकसिंचनाने पाणी हे झाडांच्या थेट मुळांशी जाते आणि झाडांचे संगोपन चांगल्या प्रकारे होत आहे. या उपक्रमात दररोज नवीन लोक जोडली जात असून उपक्रमाचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे.

“दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमावर नियंत्रण आणने अत्यंत महत्वाचे झाले असून त्यासाठी झटून काम करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे. या पद्धतीने वृक्षांना चांगल्याप्रकारे पाणी दिले जात आहे. यापुढे ही मोहीम वाढवण्यात येणार असून वृक्षांबद्दल जनजागृती करण्यात येणार आहे. फोन करा आम्ही झाड लावायला येतो, हा उपक्रम सुद्धा सुरु केला असून यास मोठा प्रतिसाद मिळत आहे.
– विठ्ठल वाळुंज ,अध्यक्ष, संतनगर मित्र मंडळ

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.