चिंचवडमधील ‘त्या’ प्रियकरास अखेर अटक

पिंपरी – प्रेमभगांतून पोलीस ठाण्याच्या पायरीवरच विष घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या प्रियकराविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे तीन दिवसांपासून अंतिम संस्कारांची प्रतीक्षा करत असलेल्या तरुणीचा मृतदेह अखेर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी आमहत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अखेर चिंचवड पोलीस ठाण्यात पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वैशाली राजू गवळी (वय-25, रा.नढेनगर, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी विराज गुलाब दराडे (रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत तरुणीच्या 29 वर्षीय मैत्रिणीने फिर्याद दिली आहे. विराजला अटक करण्यात आली असून त्याला मंगळवारपर्यंत (दि.8) त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

वैशाली एका मॉलमध्ये काम करीत होती. तिथे तिची विराजसोबत ओळख झाली. वैशालीला आई-वडील नसल्याचे कळताच त्याने ओळखीचे रुपांतर मैत्रीत व पुढे प्रेमात केले. विराजने वैशालीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी लग्नाचे आश्‍वासनही दिले. मात्र पुढे तो टाळाटाळ करु लागला. वैशालीने विराजसोबत लग्न व्हावे, यासाठी सर्व प्रयत्न केले. परंतु अपयश हाती लागल्याने तिने चिंचवड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्याचा प्रयत्न केला, मात्र तिला कोणी दाद दिली नाही. त्यामुळे तिने चिंचवड पोलीस ठाण्याच्या पायरीवरच विष प्राशन केले आणि तिथूनच आपल्या मैत्रिणीला फोन लावला.

मैत्रिणीने तिला उपचारासाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात नेले. परंतु शेवटच्या घटका मोजत असलेल्या वैशाली भेटण्यासाठी विराज तिथेही आला नाही. अखेर वैशालीने प्राण सोडले. तिच्या मृतदेहाचा अंतिम संस्कार करण्यासाठी नातेवाईक देखील सापडत नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून शवागृहांमध्ये वैशालीचा मृतदेह ठेवण्यात आला होता. अखेर शनिवारी वैशालीची मावशी विजया थोरात हिने वैशालीचा मृतदेह स्वीकारला असून तिच्यावर तिच्या मूळगावी अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पोलिसांनी प्रियकरास अटक करुन पुढील तपास सुरू केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.