- आयुक्त श्रावण हर्डीकर यांची माहिती
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोना रुग्णांची संख्या कमी होत चालली आहे. तसेच रुग्ण दुपट्ट होण्याचा कालावधी वाढून तो 120 दिवसांवर आला आहे. सद्यस्थितीत दिवसाला साडेतीन हजार चाचण्या केल्या जात असल्याची माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, मे च्या मध्यापर्यंत रुग्णसंख्या नियंत्रणात होती. मे अखेर करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली. जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाली. ऑगस्टमध्ये देखील रुग्णवाढीचे प्रमाण कायम राहिले. सप्टेंबरच्या पहिले पंधरा दिवसांत झपाट्याने वाढ होताना दिसून आली. सप्टेंबर अखेर आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात रुग्णवाढ काहीसी आटोक्यात आली.
शहरातील करोनाची रुग्णसंख्या 85 हजाराच्या उंबरठ्यावर आहे. शहरात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे. शहरात कालपर्यंत 84 हजार 31 जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 78 हजार 758 जणांनी करोनावर मात केली आहे. सध्या 5 हजार 636 सक्रिय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील 1441 जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या 566 अशा 2007 जणांचा कालपर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहरातील करोनाचे रुग्ण दुपटीचा कालावधी 120 दिवसांवर गेला आहे. 29 सप्टेंबर रोजी 74 दिवसांवर होता. आता 120 दिवसांवर गेला आहे. आजपासून पुढील 120 दिवसांनी रुग्ण दुप्पट होतील. दिवसाला साडेतीन हजार चाचण्या केल्या जात आहेत. गणेशोत्सवाच्या कालावधीत नागरिक एकत्र आल्यामुळे करोनाची रुग्णसंख्या वाढली होती.
आगामी काळात येणाऱ्या नवरात्री, दसरा, दिवाळी हे सण खूप महत्वपूर्ण राहणार आहेत. नागरिकांनी खूप काळजी बाळगण्याची गरज आहे. अनलॉकमध्ये रेस्टॉरंट, बार, हॉटेल खुले केले आहेत. अन्न सेवन करायचे असल्यामुळे सगळे लोक मास्क काढूनच बसणार आहेत, यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन हर्डीकर यांनी केले आहे.