990 नवीन रुग्णांची भर : 13 जणांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाबाधित रुग्णांनी 33 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहरात आज 990 नवीन रुग्णांची भर पडली. आतापर्यंत शहरात 33,484 जणांना करोनाची लागण झाली आहे. तर 675 जणांचा मृत्यू झाला आहे.
पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, आज चार वाजेपर्यंत शहरात 990 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शहरातील 919 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील तब्बल 71 जणांना करोनाची लागण झाली आहे. आज दिवसभरात 13 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आतापर्यंत शहरातील एकूण रुग्णांची संख्या 33,484 इतकी झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यस्थितीत शहरात 5512 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 418 रुग्णांचाही समावेश आहे. पालिकेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, शुक्रवारी दिवसभरात शहरातील 13 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला.
शहरातील भोसरी, निगडी, मोशी, तळवडे, रहाटणी, चिंचवड, थेरगाव, दापोडी येथील 11 रुग्णांचा मृत्यू झाला. तर देहूरोड व जुन्नर येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 1219 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 23,672 इतकी झाली आहे.