शत्रूने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर- राजनाथ सिंह

नवी दिल्ली: भारताने कधीच कुणावर हल्ला केला नाही किंवा दुसऱ्या देशाची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. त्या वस्तुस्थितीची साक्ष इतिहास देतो. मात्र, शत्रूने हल्ला केल्यास भारताकडून नेहमीप्रमाणे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी भारताविषयी वाईट भावना बाळगणाऱ्यांना दिला.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राजनाथ यांनी सशस्त्र दलांना उद्देशून संदेश दिला. त्यातून त्यांनी चीन आणि पाकिस्तान या कुरापतखोर शेजाऱ्यांना इशारा दिल्याचे मानले जात आहे. भारताचा भर इतरांचा प्रदेश नव्हे; तर इतरांची मने जिंकण्यावर आहे. मात्र, भारत कधीच स्वयंप्रतिष्ठेला धक्का पोहचू देणार नाही. भारताकडून राष्ट्रीय सुरक्षेसाठी उचलली जाणारी पाऊले केवळ स्वरक्षणासाठी असतात. इतर देशांवर हल्ले करण्याचा इरादा त्यामागे नसतो, अशी भूमिका राजनाथ यांनी मांडली.

सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी पाऊले उचलली जात आहेत. संरक्षण दल प्रमुखांच्या नियुक्तीमुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलात प्रभावी समन्वय निर्माण झाला आहे. राफेल लढाऊ विमानांमुळे सशस्त्र दलांच्या इतिहासात नवे युग सुरू झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.