पिंपरी – मारठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्यासह लाखो मराठा बांधव मुंबईकडे निघाले आहेत. सर्व आंदोलक उद्या बुधवारी (दि. 24) रोजी पदयात्रेने शहरात दाखल होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सांगवी फाटा येथे विविध संघटना व सार्वजनिक मंडळ जरांगे यांचे भव्य स्वागत करणार आहेत. त्यानंतर रक्षक सोसायटी चौक येथे पिंपळे निलख ग्रामस्थ तसेच जगताप डेअरी चौकामध्ये रहाटणी व पिंपळे सौदागरचे ग्रामस्थ काळेवाडी फाटा येथे काळेवाडी चे ग्रामस्थ व विविध मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे.
सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव येथे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व संतोष मंगल कार्यालयाचे सचिन बारणे व विविध मित्र मंडळ मोठ्या उत्साहात स्वागत करून अन्नदान तसेच पाणी वाटप करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या डांगे चौक थेरगाव येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मनोज जरांगे अभिवादन करणार आहेत. काळेवाडी फाटा ते बिर्ला हॉस्पिटल रोडवर शेकडो मंडळी व सामाजिक संघटना थेरगाव ग्रामस्थ वाकड ग्रामस्थ ताथवडे ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत करणार आहेत.
याप्रसंगी सर्वच मंडळे अन्नदान वाटप फळे वाटप पाणी चहा वाटप करणार आहेत. चिंचवडे लॉन्स, वाल्हेकरवाडी कॉर्नर, चिंचवड येथे चिंचवड ग्रामस्थ सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा व विविध मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. चिंचवडगाव येथील चाफेकर पुतळा चिंचवड स्टेशन येथील लहुजी वस्ताद साळवे व वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास जरांगे पाटील अभिवादन करणार आहेत.
आकर्डी ग्रामस्थांच्या वतीने या पदयात्रेचे ढोल ताशांच्या गजरात फुले उधळून स्वागत करण्यात येणार आहे याप्रसंगी खंडोबा मंदिरात मनोज जरांगे यांच्या हस्ते आरती होणार आहे. भक्ती शक्ती समोर शिल्प छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांना अभिवादन करून ही पदयात्रा लोणावळ्याकडे मार्गस्थ होणार आहेत.
महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून मंगळवारी रात्री हजारो मराठा बांधव पदयात्रेत सामील होण्यासाठी आलेले आहेत. त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीने संतोष मंगल कार्यालय थेरगाव, चिंचवडे लॉन्स चिंचवड आणि खंडोबा मंदिर ट्रस्ट मंगल कार्यालय येथे करण्यात आली आहे.
आरोग्य सुविधा-खाजगी हॉस्पिटल्स व महानगरपालिका वैद्यकीय विभागाच्या वतीने अॅम्ब्युलन्स तसेच मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. संतोष मंगल कार्यालय थेरगाव येथे मातोश्री हॉस्पिटलच्या वतीने डॉक्टर सुशील थोरवे डॉ.गणेश जाधव डॉ.मीनाक्षी वर्मा डॉ. बाळासाहेब सोनवणे आणि सहकारी मोर्चेकर्यांची वैद्यकीय तपासणी करून मोफत औषधोपचार करणार आहेत. तसेच चिंचवडे लॉन्स येथे डॉक्टर मोहन पवार संचलित त्रिवेणी हॉस्पिटल व वर्ल्ड मराठा आँर्गनायजेशनच्या डॉक्टर प्रतीक भोईर यांच्या वतीने मोफत वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. आकुर्डी येथे डॉ.प्रसाद देशमुख व सहकार्यांच्या वतीने मोफत वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठा टँकर सुविधा व स्वच्छतागृहाची व्यवस्था पदयात्रा मार्गावर मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज व विविध मंडळाचे हजारो कार्यकर्ते मोर्चा सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत.