- रावेत, शिरगाव आणि म्हाळुंगे पोलीस ठाण्यांना मिळाली अंतिम मंजूरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आणखी तीन पोलीस ठाण्यांची वाढ होणार आहे. शिरगाव, रावेत आणि म्हाळुंगे पोलीस ठाण्यांनाही अंतिम मंजुरी देण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. तसेच शहर पोलीस दलाला आणखी एक अपर पोलीस आयुक्त आणि दोन उपायुक्त मिळणार आहेत.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची स्थापना 15 ऑगस्ट 2018 रोजी झाली. त्यावेळी तीन टप्प्यात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र गेल्या दीड वर्षापासून करोनामुळे या कामाला खीळ बसली. मात्र पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडून याबाबत वेळोवेळी प्रस्ताव पाठविण्यात येत आहेत. आयुक्तालयात सध्या एक अपर पोलीस आयुक्त तसेच तीन पोलीस उपायुक्त कार्यरत आहेत. नवीन पद मंजुरीमुळे आता अपर आयुक्तांची संख्या दोन तर उपायुक्तांची संख्या पाच होणार आहे.
सध्याचे अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे प्रशासनासह इतर सर्व विभागांचा पदभार आहे. आणखी एक अपर आयुक्त उपलब्ध होणार असल्याने या कामकाजाची विभागणी होणार आहे. प्रशासन, मुख्यालय, गुन्हे शाखा तसेच परिमंडळ, वाहतूक शाखा अशा पद्धतीने जबाबदारीचे वाटप होऊ शकते. तसेच दोन नवीन उपायुक्त उपलब्ध झाल्यानंतर सध्याच्या दोन परिमंडळांमध्ये वाढ होऊन एकूण तीन परिमंडळ होणार आहेत. तसेच वाहतूक व गुन्हे शाखेचा पदभार स्वतंत्रपणे एका उपायुक्तांकडे देण्यात येणार आहे.
पोलीस ठाण्यांना वित्त विभागाची मंजुरी
पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाल्यानंतर तत्कालीन पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी रावेत, म्हाळुंगे (चाकण), तसेच शिरगाव चौक्यांना पोलीस ठाण्यांचा दर्जा दिला होता. तसेच पोलीस ठाणे म्हणून मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर आता राज्याच्या वित्त विभागाकडूनही मान्यता मिळाली आहे. त्यामुळे या तीनही पोलीस ठाण्यांना अंतिम मंजुरी मिळाली असल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.