पुणे – बहिणीच्या लग्नाला जाण्याबाबत विचारणा केल्यानंतर डॉक्टर पत्नीचे डॉक्टर पतीनेच चाकूने केस कापल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात घडला. याप्रकरणी डॉक्टर पतीला विश्रांतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
डॉ. रवी दिगंबर धादवड (रा. तिरूपती रेसीडेन्सी, मुंजोबा वस्ती, धानोरी, विश्रांतवाडी) याला अटक केली आहे. याबाबत डॉ. पल्लवी रवि धादवड (37) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी ह्या डॉक्टर असून त्यांचे पती हे देखील डॉक्टर आहे. दोन वर्षापासून ते मुंजाबावस्ती येथील तिरूपती रेसिडेन्सी येथे राहत आहे. त्यांना चार वर्षाची मुलगी आहे. दोघांचा विवाह चार वर्षापूर्वी झाला होता. लग्न झाल्यावर काही दिवस ठिक गेल्यावर पतीने त्यांना माहेरहून पैसे आणवेत यासाठी मारहाण सुरू केली. परंतु, पल्लवी यांनी आई वडीलांच्या सामाजिक स्थानामुळे मारहाणीची वाच्चता त्यांच्याजवळ केली नाही.
परंतु, मारहाणीचा प्रकार जास्तच वाढत चालल्यानंतर त्यांनी शेवटी नाशिक येथे माहेरी जाणे पसंत केले. परंतु, आई-वडीलांनी पतीला समजाऊन पुन्हा त्याच्याकडे नांदण्यासाठी पाठविले. फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांच्यात पुन्हा भांडणे झाली. त्यानंतर पल्लवी या पुन्हा नाशिकला निघुन गेल्या. याच दरम्यान सासर्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला पतीने त्यांनाच जबाबदार धरले. नातेवाईकांनी पुन्हा समजुत काढून पल्लवी यांना नांदायला पाठविले.
पती सोबत राहत असताना रविवारी (दि. 8) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पल्लवी यांनी त्यांच्या मुलीसोबत जेवण केले. परंतु पती हा दारू पित बसला होता. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास तो पल्लवी यांच्या जवळ गेला. त्याने पल्लवी यांना शिवीगाळ करून माझे वडील तुझ्यामुळेच वारल्याचा आरोप केला. तसेच शिवीगाळ करत असताना पल्लवी यांनी माझ्या बहिणीचे लग्न आहे, मी लग्नाला जाते म्हणून त्यांनी पतीला विचारणा केली.
यावरून पतीने अधिकच चिडून जात, तु कशी जाते मी पाहतो असे म्हणुन घरात त्याने लपवुन ठेवलेला चाकू काढून त्यांच्या डोक्याचे केस कापले. त्याला पल्लवी यांनी रडून विरोध केल्यानंतर त्याने त्यांच्या पाठीवर, उजव्या दंडावर चाकू मारू जखमी केले. मारहाण करताना पतीच्या हातालाही चाकू लागला. त्याने पती मेडीकलमध्ये औषधे आणण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा बंद करून पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लावून पोलिसांना बोलवून घेतले. पोलिस घरी आल्यानंतर त्यांनी पल्लवी यांना जवळच्या खासगी रूग्णालयात दाखल केले. तर पती डॉ. रवी याला ताब्यात घेतले आहे.