पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराच्या एका टोकापासून दुसऱ्यापर्यंत म्हणजेच निगडी ते दापोडी दरम्यान 13 किलोमीटर अंतरावर पदपथ अस्तित्वात राहिला नसून, जागोजागी विविध प्रकारच्या व्यावसायिकांनी अतिक्रमणे केली आहेत. त्यामुळे महामार्गावरून जीव मुठीत धरून चालण्याची वेळ अबालवृद्धांवर आली आहे. तर, उघड्या डोळ्यांनी दिसत असूनही महापालिका व वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. पदपथांना “मोकळा श्वास’ मिळवून देण्याची गरज आहे.
पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार हे निगडी आहे. तर, शहराचे दुसरे टोक दापोडीपर्यंतचे आहे. सुमारे 13 किलोमीटरच्या या महामार्गावरील रस्ते मोठे करण्यासाठी पालिकेने वेळोवेळी रुंदीकरण केले. मात्र, त्याचा लाभ नागरिकांना झालाच नाही. वाढलेल्या रस्त्यांवर सर्वात आधी व्यावसायिकांनी कब्जा घेतला. पदपथांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. शहर हद्दीत महामार्गावरील एकाही गावात पदपथांवर पादचाऱ्यांना चालण्याची सोय राहिलेली नाही. हातगाड्या, पथारीवाले, रिक्षाचालक ते मोठे व्यावसायिक अशी अतिक्रमणे पदपथावर दिसतात. अनेक ठिकाणी पदपथ नाहीत, जेथे आहेत त्यावर अतिक्रमणे झालेली आहेत.
अतिक्रमण दिसत नाही का?
सध्या मोठ्या प्रमाणात बीआरटीमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत आहे परंतु पदपथांवरील अतिक्रमण दिसत नाही का? असा मोठा प्रश्न आहे. सध्या चिंचवड, नाशिकफाटा ते शंकरवाडीदरम्यान मोठ्या प्रमाणात होत असलेली अतिक्रमणे संबंधित अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का? असा प्रश्न आहे. निगडी, फुगेवाडी, कासारवाडी, वल्लभनगर, दापोडी, चिंचवड, काळभोरनगर, आकुर्डी, खराळवाडी, पालिकेच्या मुख्यालयासमोर, चिंचवडच्या मॉलसमोर, चिंचवड स्टेशन, पिंपरी पोलीस ठाण्यासमोर, राका गॅस परिसरात रस्त्यावरच अतिक्रमणे केली आहेत. तेथे पादचाऱ्यांना चालण्याची सोय नाही.
येथे पदपथच नाही
निगडी ते आकुर्डीपर्यंतचा काही परिसर, पिंपरी, खराळवाडी, चिंचवडस्टेशन, वल्लभगरचा काही भाग, कासारवाडीतील काही परिसरात पदपथ असले तरी त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने येथे पदपथच दिसत नाहीत. पदपथ नसलेल्या ठिकाणी रस्त्यावरच नागरिकांनी वाहने पार्क केलेली आहेत. तर, वल्लभनगर परिसरात सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे चालण्यासाठी पदपथच नाही.
चौकांचे सुशोभीकरण
महापालिकेने चौकांचे सुशोभीकरण केले आहे. मध्यभागी प्रचंड मोठे गोलाकार ठेवल्याने वळसा घालताना वाहनचालकांची दमछाक होते. सिग्नलची वेळ खूपच कमी असल्याने ठराविक मोजकी वाहने जाताच लाल दिवा पडतो. मोरवाडी चौका, चिंचवड स्टेशन चौक, नाशिकफाटा यांसह अनेक चौकांमधील हिच स्थिती आहे. त्यामुळे ते पार करताना कसरत होते.