पिंपरी – पिंपरी महापालिकेच्या वतीने नेहरूनगर येथील उभारण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचे काम प्रगतीपथावर असून ते येत्या डिसेंबर अखेर पूर्ण होणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिली. इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर या ठिकाणी भेट देऊन क्रीडांगणामधील लॉन टेनिस, ऍथलॅटिक ट्रॅकची पाहणी करून काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
स्थापत्य क्रीडा विभागाच्या चालू असलेल्या कामांच्या स्थळांची पाहणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी केली. अपूर्ण कामे त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी सह शहर अभियंता मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता हनुमंत शिंदे आदी उपस्थित होते.
भोसरी स.नं.1 येथील क्रीडांगण संकुल मधील स्टेडियम गॅलरीशी चालू कामाची पाहणी करून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून विविध खेळण्यासाठी मैदान उपलब्ध करून द्यावे तसेच कुस्ती प्रशिक्षण केंद्रामध्ये ठिकठीकाणी तैलचित्र लावणे अशा सूचनाही त्यांनी केल्या. यावेळी कुस्ती प्रशिक्षक अजय लांडगे त्यांचे समवेत उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान व प्राणीसंग्रहालयास भेट दिली. त्यावेळी उपायुक्त संदीप खोत, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.अरुण दगडे आदी उपस्थित होते. सर्पोद्यान व प्राणीसंग्रहालय नागरिकांना खुले करण्याची तातडीची कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या. स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल कृष्णानगर येथील लॉन टेनिस, रायफल शूटिंगच्या चालू कामाची माहिती घेऊन सदरचे काम पूर्ण करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी संबंधितांना दिल्या.