पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) – अडगळीची ठिकाणे पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहेत. डिसेंबर 2019 मध्ये तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी शहरातील निर्जन ठिकाणांची पाहणी करून तिथे गस्त वाढविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पुढे त्याची अंमलबजावणी झाली नाही. परंतु पिंपरीतील एका लहान मुलाचे अपहरण आणि खून करुन त्याचा मृतदेह एमआयडीसीतील एका बंद कंपनीच्या टेरेसवर टाकण्यात आला. निर्जन ठिकाणी वाढत असलेल्या अपघतांमुळे आता पुन्हा एकदा ही निर्जन ठिकाणे पोलिसांच्या रडारवर आली आहेत. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निर्जन ठिकाणे, मोकळी मैदाने आणि पडीक इमारतींची पाहणी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
नोव्हेंबर 2019 मध्ये हैद्राबाद येथे एका महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार करून तिला जाळण्यात आले. या धक्कादायक घटनेने संपूर्ण देश हादरला. यामुळे देशभरात निर्जन ठिकाणांची चर्चा झाली. दरम्यान डिसेंबर महिन्यात हिंजवडी येथे कोलते पाटील स्कीमच्या मागील बाजूला निर्जन ठिकाणी एका स्केटिंगपटूचा बियरच्या बाटलीने गळा चिरून खून केल्याची घटना घडली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व निर्जन ठिकाणांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना केल्या. निर्जन स्थळांची माहिती घेऊन संबंधितांना निर्जन ठिकाणी पुरेशा प्रकाशाची उपलब्धता करून, सीसीटीव्ही बसविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांची पेट्रोलिंग देखील वाढविली जाणार होती.
तीन वर्षे उलटून गेली तरी सर्व निर्जन स्थळांवर अजूनही प्रकाश व्यवस्था, सीसीटीव्ही लागलेले नाहीत. ही बाब नुकतीच उघड झाली आहे. पिंपरी येथील एका लहान मुलाचे अपहरण करून त्याचा खून केला. त्यानंतर मुलाचा मृतदेह एमआयडीसी परिसरातील एका बंद पडलेल्या कंपनीच्या टेरेसवर टाकला. याच ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असते तर त्या भागात घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना घेता आली असती.
मोकळ्या भूखंडावर निगराणी हवीच
मोकळ्या जागेतून साहित्य चोरीला जाते. मोकळ्या जागेत अंमली पदार्थांचे सेवन, विक्री केली जाते. मोकळ्या जागांमध्ये मारहाणीसारख्या घटना घडतात. निर्जन ठिकाणी एकांतात गेलेल्या अनेकांना मारहाण करणे, लुटणे असे प्रकार घडले आहेत. पडीक इमारती गर्दुल्यांसाठी सेफ झोन ठरत आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी पोलिसांचा वावर वाढणे आणि या परिसरावर निगराणी ठेवणे गरजेचे बनले आहे.
शहराच्या हद्दीत आढळली 151 ठिकाणे
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी निर्जन स्थळांची माहिती घेण्याचे आदेश दिल्यानंतर सर्व ठाणे प्रमुखांनी आपापल्या ठाण्याच्या हद्दीतील 151 मोकळी मैदाने, निर्जन ठिकाणे आणि पडीक इमारतींची माहिती काढली आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत 45 मोकळी मैदाने आहेत. भोसरी आणि पिंपरी परिसरात सर्वाधिक मोकळी मैदाने आहेत. 81 निर्जन ठिकाणे असून वाकड, पिंपरी आणि भोसरीत 24 निर्जन ठिकाणे आहेत. शहरातील 25 पडीक इमारतींपैकी भोसरी आणि चिखलीत 12 इमारती आहेत. या ठिकाणी अनुचित प्रकार घडण्याची दाट शक्यता आहे. त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करण्याच्या सूचना देखील पोलिसांनी दिल्या आहेत.