पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) – महापालिकेमार्फत देण्यात येणा-या सेवांचे वितरण सुधारण्यासाठी प्रभाग स्तरावरील स्पर्धा टिकविणे गरजेचे आहे. त्याकरिता एक डिजिटल व्यासपीठ आणि शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) स्थानिकीकरण करण्यासाठी इनवॉर्डस प्रकल्प उपयोगी ठरणार आहे. प्रकल्पामध्ये वॉर्ड-स्तरीय मूल्यांकनासाठी डेटा इनपुट यंत्रणा असलेले वेब पोर्टल आणि भू-स्थानिक विश्लेषणात्मक डॅशबोर्डचा समावेश करण्यात आलेला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, मओएचयुएच्या पुढाकाराने इंडिया स्मार्ट सिटीज फेलोवशीप प्रोग्रॅम अंतर्गत टीम ऍस्पयरचे फेलोज पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. मार्फत इनवॉर्डस प्रकल्प राबविण्यात येत आहे. राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता पंधरवाडा उपक्रमांतर्गंत सदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते स्थायी समिती सभागृह करण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, सह आयुक्त आशादेवी दुरगुडे, शहर अभियंता मकरंद निकम, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, उपायुक्त विठठल जोशी, सुभाष इंगळे, अजय चारठणकर, मनोज लोणकर, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सह शहर अभियंता रामदास तांबे, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार यांच्यासह मनपा विभाग प्रमुख व अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय एमओएचयुएच्या पुढाकाराने इंडिया स्मार्ट सिटीज फेलोशिप प्रोग्रामअंतर्गत आकृती मु-हेकर, अंशुल राठौर, सतरुपा रॉय आणि विघ्नेश्वर जे. यांच्या टीमद्वारे हा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या फेलोजद्वारे प्रकल्पाचे सादरीकरण
करण्यात आले.
नागरिकांचा सहभाग विकासासाठी प्रेरक ठरणार
या प्रकल्पामध्ये शहरी क्षेत्रातील सेवांचे गुणात्मक मूल्यांकन करण्यासाठी नागरिकांच्या आकलनाची तरतूद केली आहे. शहराच्या सुविधांचा प्रभाग स्तरावरील सर्वांगीण आढावा घेण्यासाठी मदत होणार आहे. नागरिकांचा सहभाग आणि त्यांच्या प्रयत्नांचे मोजमाप देखील सर्वसमावेशक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, असेही यावेळी सांगण्यात आले.