पिंपरी, दि. 6 (प्रतिनिधी) -राज्यात सत्तांतर झाल्यावर अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्यांना सुरवात झाली आहे. महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर आता पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. त्यांच्या जागी पोलीस आयुक्त म्हणून अर्चना त्यागी यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यात आघाडीची सत्ता येताच पुन्हा आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांची वर्णी शहरात लावल्याचे बोलले जाते. त्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेत राजेश पाटील तर पोलीस दलात अंकुश शिंदे हे आयुक्त म्हणून आले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे सरकार आल्यावर पुन्हा एकदा आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले. त्यातूनच राजेश पाटील यांची मुदतपूर्व बदली झाली. त्यांच्याजागी शेखर सिंह हे नवे आयुक्त म्हणून शहरात आले.
महापालिका आयुक्तांच्या मुदतपूर्व बदलीनंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या बदलीची चर्चा होती. मात्र त्यांची बदली न झाल्याने ही चर्चा तात्पुरती थांबली. अंकुश शिंदे हे आपला कार्यकाळ पूण करतील अशी अपेक्षा होती. आता मात्र पुन्हा पोलीस आयुक्तांच्या बदलीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्याजागी आयपीएस अधिकारी अर्चना त्यागी यांची वर्णी लागणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप शिंदे यांच्या बदलीचे कोणतेही आदेश आलेले नाहीत.
आयपीएस लॉबीचा दबाव?
अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना साइड पोस्टींग देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे पदही याच दर्जाचे आहे. मात्र महाविकास आघाडीचे सरकार असतानाही विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांची नियुक्ती केली. त्यांच्या बदलीनंतर पुन्हा याच दर्जाचे अधिकारी अंकुश शिंदे यांची वर्णी लागली. मात्र अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावर असलेल्या आयपीएस अधिकाऱ्यांनी याबाबत सरकारवर दबाव आणला. यामुळे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.