पिंपरी -महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रशासकीय लवादने (मॅट) रद्द केल्यानंतर आता जांभळे मुंबई उच्च न्यायालयात या विरोधात धाव घेणार असल्याचे समजते. पाच महिन्यानंतर “मॅट’चा निकाल आल्याने हा वाद संपेल असे वाटत होते. मात्र, तो तिढा आणखीच वाढत चालला आहे.
मउपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची 13 सप्टेंबर 2022 रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. मात्र, आयुक्त शेखर सिंह यांनी नऊ दिवस झगडे यांना रुजू करुन घेतले नाही. त्यानंतर राज्य शासनाने 22 सप्टेंबर 2022 रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करून वसई-विरार महापालिकेचे उपायुक्त प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जांभळे यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्विकारला. मात्र, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला मॅटमध्ये आव्हान दिले. मॅटमधील या प्रकरणाचा दि. 17 फेब्रुवारी रोजी निकाल लागला. यामध्ये प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती रद्द करण्यात आली. उपायुक्त स्मिता झगडे यांना दोन आठवड्यात महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती देण्याचे आदेश ए. पी. कुऱ्हेकर यांनी राज्य शासनाला दिले. तर, अतिरिक्त आयुक्त जांभळे या निकालाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे समजते. तर जांभळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करताच उपायुक्त झगडे याही कॅव्हेट दाखल करणार असल्याची माहिती आहे.
वाद अशोभनिय
महापालिकेत लोकप्रतिनिधी नसल्याने प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांचा एक कलमी अंमल आहे. अतिरिक्त आयुक्त-1 पदाच्या वादावरून महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. या वादावर आयुक्तही तोडगा काढत नसल्याने हा वाद अशोभनिय असल्याची चर्चा रंगली आहे.