पवनानागर – पवनमावळ परिसरातील मुख्य बाजारपेठ असलेले पवनानगर हे गाव आहे. त्यामुळे बाजारपेठ असलेले गाव सर्व दृष्ट्या विकसित असल्यामुळे पवनानगर येथील पवना विद्या मंदिर आणि ज्युनिअर कॉलेज या विद्यालयात परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना आजही पायपीट करावी लागत आहे.
या विद्यालयात संपूर्ण पवनमावळ परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. पवनमावळ हा ग्रामीण भाग असून तुंग, चावसर, मोरवे, अजीवली, जवन, आंबेगाव या गावांमधून विद्यार्थी येत असतात. परंतु हा भाग पूर्णपणे ग्रामीण असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना विद्यालयापर्यंत येण्यास वाहतुकीची कोणतीही शासकीय सुविधा नाही.
तसेच कुठलाही वाहतुकीचा पर्याय नाही. पण शिक्षण ही काळाची गरज असल्यामुळे काही पालक खासगी वाहन करून चारचाकी करून आपल्या पाल्ल्यांना शाळांमध्ये पाठवतात. त्यात पिकअप, सुमो, इको अशा गाड्यांचा समावेश आहे.
परंतु गाडीमालक पाल्ल्यांकडून अवाच्यासव्वा दर आकारतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासी वाहने मिळत नाहीत. तसेच बाकीचे गाडी मालक गाडी भरल्याशिवाय गाडी हलवत नाहीत. त्यामुळे अनेकवेळा गाडी भरण्याची वाट पाहावी लागते.