पिंपरी – महापालिकेच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ११ ते १५ जानेवारी दरम्यान आयोजित पवानाथडी जत्रेतील स्टॉल्सची आज लकी ड्रॉद्वारे सोडत काढण्यात आली. बचत गटांच्या महिला प्रतिनिधींच्या हस्ते चिठ्ठ्या काढून ७५० स्टॉल्स निश्चित करण्यात आले.
महापालिकेच्या वतीने महिला व बाल कल्याण योजनेंतर्गत महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तसेच वैयक्तिक महिलांनी तयार केलेल्या वस्तू उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांना विपणन कौशल्ये ज्ञात व्हावीत, एकूणच महिला उद्योजिका तयार होऊन महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी पवनाथडी जत्रेचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यावर्षी देखील ११ ते १५ जानेवारी या कालावधीत सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदान येथे पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये खाद्यपदार्थांसह विविध वस्तूंची विक्री व प्रदर्शन करणाऱ्या बचतगटांना पवनाथडी जत्रेतील स्टॉलचे वाटप लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात आले.
पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सची सोडत उपायुक्त चारठाणकर यांच्या हस्ते आज महापालिकेत लकी ड्रॉ द्वारे काढण्यात आली. सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध महिला बचत गटांच्या प्रतिनिधींसमोर सोडत प्रणाली पार पडली. यावेळी उपस्थित महिला बचत गटांच्या प्रतिनिधींच्या हस्तेही लकी ड्रॉमध्ये असलेल्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली आणि पवनाथडी जत्रेतील स्टॉल्सची निश्चिती करण्यात आली.
दिव्यांग व तृतीयपंथीयांना ही संधी
पवनाथडी जत्रा पर्यावरणपूरक पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला असून स्टॉल धारक बचतगटांनी यामध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन उपायुक्त अजय चारठाणकर यांनी केले. तर, दिव्यांग तसेच तृतीयपंथीयांसाठी देखील पवनाथडी जत्रेतील काही स्टॉल्स राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट यांनी दिली.