पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. पोलिसांनी काही दुचाकी चोरांना अटक केली आहे. मात्र, दुचाकी चोरीचे प्रमाण पाहता गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. चोरलेल्या दुचाकी तासाभरात भंगारात घातल्या जात असल्याची चर्चा आहे. एका दुचाकीमागे चोरट्यांना दहा हजार रुपये मिळत असल्याची माहिती पुढे आली आहे.
नुकतीच हिंजवडी पोलिसांनी परभणी येथील दुचाकी चोरास अटक करून त्याच्याकडून 18 दुचाकी हस्तगत केल्या. त्याचवेळी वाकड पोलिसांनीही दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत चोरीच्या 10 दुचाकी जप्त केल्या. तळेगाव दाभाडे पोलिसांनीही चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या. मात्र, वाहन चोरीच्या आकडेवारीवर नजर टाकली असता दुचाकी चोरी आणि उघडकीस येणारे गुन्हे यांच्यात मोठी तफावत आहे. चोरीला गेलेली वाहने सापडत नसल्याने दुचाकी चोरीमध्ये मोठे “रॅकेट’ सक्रिय असल्याचे बोलले जाते. हे “रॅकेट’ शहरातून दुचाकी चोरी करून त्यांची भंगारात विक्री करतात.
दिवसभर टेहळणी करून रात्रीच्या वेळी ते दुचाकी चोरून पसार होतात. दुचाकी चोरीसाठी स्थानिक गुन्हेगारांची टोळीही सक्रिय आहे. दुचाकी चोरल्यानंतर ते तासाभरात त्याचे स्पेअरपार्ट भंगारात घालतात. दुचाकी खोलण्यासाठी एका गोडावूनही केले आहे. इथंपर्यंतची माहिती पोलिसांना मिळाली आहे. या टोळीच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलीस आहेत.
दुचाकींच्या किमती खूप वाढल्या आहेत. नवीन दुचाकी खरेदीसाठी किमान एक लाख रुपये मोजावे लागत आहेत. जुन्या दुचाकीचा सध्या 35 ते 40 हजारांपर्यंत दर गेला आहे. शक्यतो चोरटे जुन्या दुचाकी चोरत आहेत. घराबाहेर अंगणात, हॉस्पिटल परिसर, अपार्टमेंटचे पार्किंग, उद्याने व मोठी शासकीय कार्यालये येथून दुचाकी चोरीला जात आहेत. यापूर्वीही दुचाकी चोरीच्या टोळ्या पोलिसांच्या हाती लागत होत्या. या टोळ्या दुचाकी चोरल्यानंतर त्या अवघ्या पाच ते दहा हजार रुपयाला विकत जात. गुन्हे उघडकीसचे प्रमाणही चांगले होते. पण, टोळ्यांनी गुन्ह्यांची पद्धत बदलली. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी त्यांनी आता दुचाकी चोरली की, विकण्यापेक्षा त्या भंगारात घालण्याचा उद्योग सुरू केला आहे. दिवसेंदिवस चोरीचा हा आकडा वाढतच आहे.
गुन्हे उघडकीसचे प्रमाण अत्यल्प!
गेल्या सहा महिन्यात 638 दुचाकींची चोरी झाली आहे. त्यापैकी केवळ 218 दुचाकींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. उर्वरित 66 टक्के दुचाकींचा शोध अद्यापही लागलेला नाही. दुचाकी चोरीचे गुन्हे प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. पण, गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाणात अत्यल्प आहे. गेल्या आठवड्यात हिंजवडी, वाकड आणि तळेगाव पोलिसांनी तीन टोळ्या पकडल्या. या चोरट्यांकडून शहरातीलच नव्हे तर इतर जिल्ह्यातीलही वाहन चोरी उघडकीस आली.
ठळक मुद्दे
पिंपरी चिंचवड शहरात दररोज चार ते पाच दुचाकींची चोरी
तपासावेळी सीसीटीव्ही यंत्रणेत दुचाकीचा क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही
पिंपरी चिचवड शहरातील दुचाकी चोरीचे लोण आता ग्रामीण भागातही
गॅरेजवाले अन् भंगारवाल्यांकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज