मांडवगण फराटा : उरळगाव (ता.शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी ऋषिकेश आणि माणिक गिरमकर यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात 107 टन ऊस उत्पादन घेऊन भरघोस उत्पादन घेतले आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळाला आहे. नियोजनबद्ध, तंत्रशुद्ध पद्धतीने त्यांनी ऊस पीक घेतल्याने त्यांनी उत्पादनाची शंभरी पार केली आहे.
ऋषिकेश गिरमकर हे शेअर मार्केटचा सल्ला देत असताना त्यांना शेतीची आवड निर्माण झाली. त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग करीत असतात. किफायदेशीर शेतीसाठी ते नेहमी आग्रही असतात. कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेत ते इतर शेतकऱ्यांना देखील मार्गदर्शन करतात.
ऋषिकेश गिरमकर हे बागायती शेतामध्ये उसाबरोबरच कांद्याचेही उत्पादन सेंद्रिय व रासायनिक अशा दोन्ही प्रकारचे खते वापरून उत्पादन घेतात. मागील वर्षी जुलै 2022 मध्ये ऋषिकेश गिरमकर यांनी त्यांच्या एक एकर क्षेत्रात 86032 जातीच्या उसाची लागवड केली. तत्पूर्वी पूर्व मशागत करताना त्यांनी एक एकर क्षेत्रात शेणखत, सुपर फॉस्फेट, पोटॅश, 10-26-26 ही खते वापरली आहेत.
विहिरीचे वेळच्यावेळी ठिबक सिंचनाने पाणी दिल्याने व पाच फूट रुंद आणि दीड फूट लांबीवर एक डोळा पद्धतीने लागवड केली. उसाची उगवण झाल्यावर जेठा कोंब खुडल्याने तसेच योग्यवेळी औषधाची फवारणी केल्याने उसाची वाढ जोमाने झाली. उसाची उंची साधारण 20 ते 25 फूट होऊन प्रत्येक उसाला 28 ते 30 कांड्या झालेल्या होत्या.
गुन्हाळाला ऊस गाळप
यावर्षी जुलै 2023 मध्ये गुऱ्हाळासाठी उसाची तोड करण्यात आली. त्यावेळी एक एकर क्षेत्रात उसाचे वजन तब्बल 107 टन भरले आहे. बागायती शेतीतील पिकाच्या उत्पादनाबरोबर उसाच्या पीक नियोजनासाठी ऋषिकेश गिरमकर यांना माजी आदर्श सरपंच सुनील सात्रस, सरपंच अशोक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. नियमित पाण्याबरोबरच औषधांची फवारणीचे नियोजन हनुमंत जाधव, मल्लिकार्जुन ऍग्रोचे अक्षय कोरेकर यांनी करून दिले. नियोजनाचा फायदा या विक्रमी उत्पादनात झाला आहे.
विक्रमी उत्पादन घेण्यासाठी प्रथमपासून नियोजन केले. त्याचा फायदा झाला. योग्य बियाणे, योग्य अंतरावर, योग्य खते व योग्य वेळी औषध फवारणी केल्याचा फायदा झाला. आता पुढील कालावधीत एकरी 120 टन उसाचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट आहे.
– ऋषिकेश गिरमकर, ऊस उत्पादक शेतकरी, उरळगाव.