पिंपरी – आदित्य बिर्ला रुग्णालयात अचलेशिया कार्डिया (एसोफेजियल मोटिलिटी डिसऑर्डर) ही पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. डॉ. प्रसाद अशोक भाटे यांनी निदान केले तर, डॉ. सुप्रशांत कुलकर्णी यांनी कुशलतेने शस्त्रक्रिया केली आहे.
रुग्णालयात ५५ वर्षीय महिला अनिता पाटील (नाव बदलले आहे) यांना गेल्या तीन वर्षांपासून गिळण्यास त्रास होत होता. त्यांचे वजन घटत होते. परंतु, बिर्ला रुग्णालयात डॉ. प्रसाद भाटे यांनी त्यांच्या अंतर्निहित मोटीलिटी डिसऑर्डरचे निदान करण्यासाठी अन्ननलिकेची मॅनोमेट्री केली. अन्ननलिकेवर दाब पडू लागल्याने त्यांना अचलेशिया कार्डिया आजाराचे निदान झाले. अचलेसिया हा अन्ननलिका गतिशीलता विकार आहे. त्यामुळे पोटातील खालच्या अन्ननलिका स्फिंक्टरची अपेक्षित हालचाल होत नाही. त्यामुळे रुग्णाला गिळण्यास त्रास होतो, असे डॉक्टरांनी स्पष्टीकरण दिले आहे.
निदानासाठी मॅनोमेट्री सर्वोत्तम पर्याय आहे. त्यासाठी लॅपरोस्कोपिक हेलर मायोटॉमी करावी लागणार होती. मात्र, रोबोटिक तंत्रज्ञानातील मिनिमली इनवेसिव्ह तंत्रांच्या सहायाने अशा शस्त्रक्रिया कमी जागेत, कमी वेळेत व रक्ताची नासाडी न करता केली जाऊ शकते. रुग्णाला जास्त दिवस रुग्णालयात ठेवण्याची गरज नसते. रोबोटिक प्रक्रियेमध्ये ३ डी दृष्टीचा समावेश आहे. त्यामध्ये मॅग्निफिकेशन आणि हाय-डेफिनिशन दृश्य डॉक्टरांना दिसते. या प्रक्रियेमधील रोबोटिक उपकरणांच्या मदतीने डॉक्टरांना स्थिर प्लॅटफॉर्म मिळतो. शरीरातील अशा ठिकाणी पोहचून इलाज करणे शक्य होते. याच प्रकारे ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांना यश आले आहे.
सर्जन डॉ. सुप्रशांत कुलकर्णी म्हणाले, हे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान केवळ निदानाची अचूकता वाढवत नाही, तर उपचारांची सुरक्षितता आणि परिणामकारकता देखील वाढवते. अशा प्रकारच्या रोबोटिक तंत्रज्ञानामुळे आम्हाला आमचे कौशल्य व क्षमता वाढवण्यास मदत मिळते, व रुग्णांना योग्य ती सेवा पुरवण्यास मदत होते.
पुण्यातील ही पहिलीच शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आमच्या टीमला यश आले. चिकित्सक उपचारासाठी सहयोग, धैर्य आणि सर्जनशीलता आवश्यक असते. आमच्य टीमला नाविन्यपूर्ण दष्टीकोनासाठी ओळखले जाते.
– रेखा दुबे, मुख्य कार्यकारी अधिकारी, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल