चंदीगड – हरियाणातील भारतीय जनता पार्टीने बहुमत गमावले आहे असा दावा करणाऱ्या विरोधी पक्षांना आज भाजपकडून आव्हान देण्यात आले आहे. त्यांच्याकडे पुरेसे आमदार असतील तर विरोधकांनी आमदारांची परेड करून दाखवावी असे आव्हान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते मनोहरलाल खट्टर यांनी दिले.
खट्टर पुढे म्हणाले की शक्ती प्रदर्शनाला भाजपचा विरोध नाही. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पार्टीच्या १० पैकी ६ आमदारांचा भाजप सरकारला पाठिंबा आहे. हरियाणातील तीन अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर सरकार अल्पमतात आले असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करून नव्याने मतदान घेण्याची मागणीही कॉंग्रेसने केली आहे. तर काही महिन्यांपूर्वी भाजपबरोबर सत्तेत असणाऱ्या जननायक जनता पार्टीनेही सरकार विरोधात आम्ही कॉंग्रेस पक्षासोबत आहोत असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री नायब सैनी म्हणाले की त्यांच्या सरकारने मार्च महिन्यातच बहुमत सिध्द केले आहे व भविष्यात गरज पडली तर ते पुन्हा सिध्द केले जाईल. तर कॉंग्रेसबाबत टिप्पणी करताना खट्टर म्हणाले की कॉंग्रेसचे ३० आमदार आहेत. मात्र आपल्यासोबत किती आमदार आहेत याची त्यांनाच खात्री नाही.
त्यांनी आमदारांची राज्यपालांसमोर परेड करावी. जननायक जनता पार्टीत काय चालले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. विरोधी पक्षांनी खरेतर बहुमताचा विषय उपस्थित करायला नको होता. आता त्यांनी तो उपस्थित केलाच आहे तर ते त्यांनीच सिध्द करून दाखवावे की त्यांच्याकडे जास्त संख्या आहे.