चिखली – श्रीकृष्ण मंदिर सेवा समितीच्या वतीने कृष्णानगर येथे सोमवार दि 29 जानेवारी ते रविवार दि. 4 फेब्रुवारी या कालावधीत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांचा तुलसी रामायण कथा सोहळा आयोजित केला आहे.
प्रभू श्रीरामांच्या अयोध्यानगरीमधील भव्य श्रीराम मंदिराच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व प्रारंभ नव्या पर्वाचा, वारसा जनसेवेचा आणि निर्धार परिवर्तनाचा या संकल्पनेतून हा उपक्रम आयोजित केला आहे. पेठ क्रमांक 20, कृष्णानगर, चिखली रोड सिमेंट ग्राउंड प्रांगणामध्ये दररोज सायंकाळी साडेसहा ते साडेनऊ या वेळेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक हे तुलसी रामायण कथा सांगणार आहेत.
1001 माता-भगिनींच्या कलश शोभायात्रेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. दि 29 जानेवारी रोजी ग्रंथ महात्म्य व शंकर पार्वती विवाह, दि 30 जानेवारी रोजी श्रीराम जन्म सोहळा, दि.31 जानेवारी रोजी अहिल्या उद्धार व सीता स्वयंवर, दि. 1 फेब्रुवारी रोजी राम वनवास, केवट कथा, दि. 2 फेब्रुवारी रोजी भरत भेट व सीताहरण, दि. 3 फेब्रुवारी रोजी वाली वध व लंका दहन तर दि. 4 फेब्रुवारी रोजी रावणवध व रामराज्याभिषेक सोहळ्यावर कथा होणार आहे.
दररोज सुमारे शंभर जोडप्यांच्या हस्ते महाआरती केली जाणार आहे. त्याचे व्यवस्था संस्कृती संवर्धन भजन महासंघ करीत आहे. कार्यक्रमासाठी मंडप, सुमारे पाच हजार भाविकांची बैठक व्यवस्था व महसूल भवनाच्या प्रांगणात पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.