पिंपरी – नोकरी, शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या भारतीयांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी चिंचवड शहरातूनही परदेशात गेलेल्यांना आपल्या घरचा फराळ चाखता यावा म्हणून भारतीय पोस्ट सेवेच्या माध्यमातून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. शहरातील 15 टपाल कार्यालयातून 14 लाख 39 हजार 189 ग्रॅम फराळ परदेशात पाठविण्यात आला असून त्यातून 10 लाख दहा हजार 375 रुपयांचे उत्पन्न पोस्टाला मिळाले आहे.
शहरातील अनेक नागरिक परदेशात स्थायिक झाले आहेत. तर मोठ्या संख्येने तरुण शिक्षणासाठी परदेशात आहेत. दिवाळीचा थोडासा का होईना फराळ चाखता यावा म्हणून नागरिक शहरातून आपल्या आप्तेष्टांना फराळ पाठवित असतात. कुरियरचे दर अत्याधिक असताना भारतीय टपाल विभागाने अत्यंत माफक दरात नागरिकांना जगभरात फराळ पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली.
या देशात पोहचला फराळ
दिवाळीनिमित्त शहरातून परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या नातेवाईकांना शुभेच्छा व फराळ पाठविण्याची सोय भारतीय टपाल विभागाकडून करून देण्यात आली होती. 25 ऑक्टोबरपासून दिवाळीपर्यंत शहरातून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, कॅनडा, दक्षिण कोरिया या देशांसह विविध देशांमध्ये फराळ पाठविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक पार्सल अमेरिकेत पाठविण्यात आले आहेत. शहरातील हिंजवडी आणि चिंचवड या परिसरातून सर्वाधिक पार्सल बुक झाले. आकुर्डी, औंध कॅम्प, सीएमई, चिंचडगाव, चिंचवड इस्ट, दापोडी, दापोडी बझार, हिंजवडी इन्फोटेक पार्क, खडकी, खडकी बझार, पीसीएनटी, पिंपळे गुरव, पिंपरी, पिंपरी कॉलनी, पिंपरी, रुपीनगर येथील टपाल कार्यालयांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होता.
पार्सल पॅकिंगची सुविधा
चिंचवड शाखेत पॅकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मजबूत व लेबल असलेली पॅकींग असल्याने खाद्यपदार्थांसह इतर वस्तू दूरपर्यंत सुरक्षित पोहचण्याची खात्री नागरिकांना झाली आहे. यामुळे पोस्टाच्या उत्पन्नात देखील वाढ झाली. स्पीड पोस्टद्वारे 35 किलो तर पार्सल द्वारे 20 किलोपर्यंत वजनाच्या वस्तू पाठवण्याची सुविधा याठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती, असे जनसंपर्क निरीक्षक के. एस. पारखी यांनी सांगितले.