पुणे – नगदी पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्यामुळे लागवड क्षेत्रात झालेली घट…गेल्या वर्षी कमी झालेले उत्पादन…यंदा पाऊसाने पाठ फिरविल्याने उत्पादनात होणारी संभाव्य घट…आरोग्यासाठी आहार तज्ज्ञ अथवा डॉक्टरांकडून देण्यात येणाऱ्या सल्ल्यामुळे ज्वारी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, मागणी जास्त आणि तुलनेने कमी होणारी आवक यामुळे ज्वारीचे भाव कडाडले आहेत.
सध्या पुणे मार्केट यार्डातील घाऊक बाजारात उच्चप्रतीच्या ज्वारीचे भाव किलोसाठी 70 ते 75 रुपयापर्यंत पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात तर आणखी महाग विक्री होत आहे. त्यामुळे गरिबाची म्हणून ओळख असलेली ज्वारीची भाकरी आता गरिबांच्या ताटातून गायब झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गहू, बाजरी आणि तांदळापेक्षाही ज्वारी महाग बनली आहे. मार्केट यार्डातही ज्वारीची आवक कमी होत आहे. सध्या येथील बाजारात नगर, सोलापूर जिल्हा, खान्देश, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून आवक होत आहे. उच्चांकी भाव मिळत असल्याने यंदा प्रथमच मध्य प्रदेश येथूनही ज्वारीची आवक होत आहे. दररोज 100 ते 150 टन आवक होत आहे.
घाऊक बाजारातील प्रति क्विंटलचे भाव (रु.)
- गावरान नं.1 ज्वारी-7000-7500
- गावरान नं.2 ज्वारी-6300-6300
- दुरी ज्वारी – 4000-5500
उत्पादन घटण्याची कारणे
भाकरी पचनास हलकी असल्याने खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच “ज्वारीचे कोठार’ म्हणून ओळखला जाणाऱ्या सोलापूर जिल्हासह विविध उत्पादक क्षेत्रात ज्वारीची लागवड घटत चालली आहे. पारंपारिक पिकाऐवजी नगदी पीक घेऊन पैसे कमविण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. उत्पादन घटल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पण, यात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत.
“अलीकडच्या काळात ज्वारीला मागणी वाढली आहे. त्यातच आवक कमी होत आहे. त्यामुळे ज्वारीचे भाव तेजीत आहेत. सध्या बाजारात ज्वारी ही गहू, बाजरी आणि तांदळापेक्षा महागली आहे” – प्रकाश नहार,ज्वारीचे व्यापारी, मार्केट यार्ड