पिंपरी, दि. 22 (प्रतिनिधी) – वाकड, चिंचवड स्टेशन आणि नाशिक फाटा येथे प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीचे थांबे आहेत. मात्र या थांब्यावरूनच अवैध प्रवासी वाहतूक करणारे प्रवाशांची पळवापळवी करीत आहेत. मात्र यामुळे आधीच तोट्यात असलेली एसटी आणखीनच तोट्यात चालली आहे. खुलेआम हा प्रकार सुरू असताना वाहतूक पोलीस, आरटीओ आणि एसटीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
गेल्यावर्षी एसटीचा संप झाला. यामुळे गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे अतिशय हाल झाले. तसेच संपामुळे एसटीचा महसूलही बुडाला. मात्र या कालावधीमध्ये अवैध प्रवासी वाहतूक करणारे आणखीनच गब्बर झाले. मात्र एसटीचा संप मिटल्यावरही अवैध प्रवासी वाहतूक कमी झाली नाही. पिंपरी चिंचवड शहराला आजवर अनेक कर्तबगार अधिकारी लाभले. त्यांनी शहरातील अवैध धंदे बंद केले. मात्र आजवर एकाही अधिकाऱ्याला अवैध प्रवासी वाहतूक बंद करता आलेली नाही.
एजंटचा सुळसुळाट
वाकड येथून मुंबई, सातारा, कोल्हापूर तसेच बंगरूळला जाण्यासाठी मार्ग आहे. येथील अनेक बस या पुणे शहरात न जाता थेट बाह्यवळण मार्गे जातात. मात्र प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने या मार्गावर वाकड पुलाखाली एसटीने थांबा केला आहे. मात्र आता या थांब्यावर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांनी कब्जा केला आहे. मुंबईला किंवा इतर ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची पळवापळवी थेट एसटीच्या थांब्यावरून करतात. येथील गाड्या भरणारे एजंट मोठमोठ्याने ओरडत, तसेच थांब्यावर थांबलेल्या प्रवाशांना अक्षरशः ओढून नेतात.
पोलिसांसमोर अवैध वाहतूक
चिंचवड स्टेशन येथेही काही वेगळी स्थिती नाही. येथील तीन ठिकाणावरून अवैध प्रवासी वाहतूकीसाठी वाहने उभी केली जातात. प्रथम ठिकाण हे एसटीचा थांबा आहे. दुसरे ठिकाण चिंचवड रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आणि तिसरे ठिकाण युनिक लहान मुलांच्या हॉस्पिटलजवळ आहे. या तीनही ठिकाणावरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची पळवापळवी होत असते. विशेष म्हणजे येथील दोन्ही चौकांमध्ये वाहतूक पोलीस असतात. मात्र त्यांनाही अवैध प्रवासी वाहतूक बंद करणे जमले नाही.
जाणीवपूर्वक दुर्लक्ष
नाशिक फाटा येथूनही नाशिक, नारायणगाव, मंचर येथे जाणाऱ्या प्रवाशांची थेट एसटीच्या थांब्यावरून पळवापळवी होते. विशेष म्हणजे येथून काही अंतरावर भोसरी पोलिसांची वाहतूक चौकी आहे. तसेच नाशिक फाटा येथेही वाहतूक पोलीस कर्तव्यावर असतात. मात्र ते देखील या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या या तीनही खात्यांबाबत चर्चा प्रवाशांमध्ये सुरू आहे.