पिंपरी, (संदीप घिसे) दि. 22 – पिंपरी चिंचवड महापालिकेने मोठा गाजावाजा करीत शहरात 20 ठिकाणी “पे-ऍन्ड पार्क’ योजना लागू केली. मात्र परवडत नसल्याचे कारण देत या कामाच्या ठेकेदाराने माघार घेतली आहे. याबाबतचे पत्र त्याने महापालिकेला दिले आहे. यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे
महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडावी यासाठी वेगवेगळ्या योजना लागू करण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणजे शहरात “पे-ऍन्ड पार्क’ योजना लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. शहरातील 396 ठिकाणी “पे-ऍन्ड पार्क’ करण्याची तयारी महापालिकेने केली. सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात 80 ठिकाणी “पे-ऍन्ड पार्क’ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. “पे-ऍन्ड पार्क’साठी आवश्यक असलेले पट्टे रस्त्यावर मारण्यात आले. काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स उभारण्यात आले. “पे-ऍन्ड पार्क’ असल्याची वाहन चालकांना माहिती व्हावी, यासाठी ठिकठिकाणी फलकही उभारण्यात आले. याबाबत निविदाही मागविण्यात आल्या. मात्र या निविदांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आलेल्या ठेकेदारांपैकी निर्मला ऑटो केअर या संस्थेला “पे-ऍन्ड पार्क’चे काम देण्यात आले.
मात्र गेल्या सहा महिन्यांतील उत्पन्न आणि कर्मचारीसाठी वर्गावर होणारा खर्च पाहाता “पे-ऍन्ड पार्क’चे काम आपल्याला परवडत नाही. आपण यातून माघार घेत असल्याचे पत्र निर्मला ऑटो केअर या कंपनीने महापालिकेला दिले आहे. तर काही ठिकाणीचे “पे-ऍन्ड पार्क’ यापूर्वीच ठेकेदाराने बंद केले आहे.
पालिका आणि ठेकेदार 50-50
महापालिकेने “पे-ऍन्ड पार्क’चे सहा पॅकेज केले. यापैकी एक पॅकेज हे बीआरटी रस्त्यावर बिल्डरांकडून महापालिकेस दिलेल्या पार्किंगच्या जागेवर “पे-ऍन्ड पार्क’साठी जागा देण्यात आली आहे. उर्वरित पाच पॅकेजमध्ये पुणे-मुंबई रस्त्यावरील नाशिकफाटा ते निगडी, चापेकर चौक, टेल्को रोड, स्पाइन रोड, औंध-रावेत बीआरटी मार्ग, केएसबी चौक-हिंजवडी (बिर्ला हॉस्पिटल जवळील मार्ग, ऑटोक्लस्टर-काळेवाडी फाटा या 20 मार्गावर “पे-ऍन्ड पार्क’ सुरू करण्यात आले. “पे-ऍन्ड पार्क’च्या मिळालेल्या पैशातून 50 टक्के महापालिका आणि उर्वरित 50 टक्के ठेकदाराला देण्याचे ठरले. त्यानुसार अंमलबजावणीही सुरू झाली. “पे-ऍन्ड पार्क’ला चालना मिळावी आणि बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिसांना कारवाईसाठी टोईंग व्हॅनही देण्यात आल्या.
शहरात 396 ठिकाणी “पे-ऍन्ड पार्क’ करण्याचे महापालिकेचे नियोजन
पहिल्या टप्प्यात शहरातील 80 ठिकाणी “पे-ऍन्ड पार्क’ करण्याचा निर्णय
प्रत्यक्षात 20 ठिकाणीच “पे-ऍन्ड पार्क’ची अंमलबजावणीस सुरवात
कडक अंमलबजावणीसाठी वाहतूक पोलिसांना पाच टोईंग व्हॅन दिल्या