- लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के चाचण्या पूर्ण
- 2 लाख 38 हजाराहून अधिक चाचण्या
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामधील करोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सरासरी एक हजाराहून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहेत. तर दररोज सुमारे 4 हजार नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत. शहरामध्ये दर चार चाचण्यांमागे एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहे. तसेच आतापर्यंत शहरातील एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के नागरिकांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. तर लोकसंख्येच्या सुमारे दोन टक्के नागरिक आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत.
शहरात सद्यस्थितीत 57 हजाराहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. मार्च महिन्यामध्ये करोनाचा पहिला रुग्ण शहरामध्ये आढळला. मार्च महिन्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या 12 होती. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. एप्रिल महिन्यापासून करोनाचे पुन्हा रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. एप्रिल महिन्यामध्ये 101 रुग्णांची नोंद करण्यात आली तर 3 रुग्णांचा मृत्यू झाला. शहरामध्ये सद्यस्थितीत दररोज सरासरी 4 हजार संशयित व कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमधील नागरिकांच्या चाचण्या केल्या जातात. शहरात आतापर्यंत 2 लाख 38 हजार 842 नागरिकांच्या चाचण्या केल्या आहेत. त्यापैकी शहरातील 57 हजार 507 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
एकूण चाचण्या व पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीनुसार शहरामध्ये सद्यस्थितीत दर चार रुग्णांमागे एक रुग्ण पॉझिटिव्ह येत आहे. तसेच एकूण 2 लाख 38 हजाराहून अधिक नागरिकांच्या करोना चाचण्या गेल्या पाच महिन्यामध्ये करण्यात आल्या आहेत. ही संख्या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे 10 टक्के इतकी आहे. आहेत. तर एकूण लोकसंख्येच्या 2 टक्के नागरिक आतापर्यंत करोनाबाधित झाले आहेत. चाचण्या करण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी 1 लाख 78 हजार 842 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शहरामध्ये आतापर्यंत 1195 रुग्णांचा करोनामुळे दुर्देवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शहरातील 959 तर शहराबाहेरील 236 रुग्णांचा समावेश आहे.
84 टक्के रुग्ण बरे
शहरामध्ये आतापर्यंत 47592 रुग्णांना घऱी सोडण्यात आले आहे. एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण 84 टक्के आहे. तर एकूण बाधित रुग्णांपैकी 2 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधित झालेल्या एकूण रुग्णांपैकी 16 टक्के रुग्ण उपचाराधीन आहेत. त्यांच्यावर महापालिकेच्या वायसीएम, भोसरी, जिजामाता, ऑटो क्लस्टर या रुग्णांलयामध्ये उपचार सुरू आहेत.