पिंपरी – पिंपरी चिंचवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शनिवारपासून (दि. 21) ते विजयादशमीपर्यंत विविध ठिकाणी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी शारीरिक प्रात्यक्षिके, घोष वादन, राष्ट्रभक्तीपर गीते आदी कार्यक्रम होणार आहेत. विजयादशमी (दि. 24) रोजी शहरातील विविध भागात भव्य पथसंचलन होणार आहे.
पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी हा उत्सव होणार आहे. या वेळी शारीरिक प्रात्यक्षिके, घोष वादन, राष्ट्रभक्तीपर गीते या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन झाल्यानंतर प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. तसेच विजयादशमी (दि. 24) रोजी शहरातील विविध भागात भव्य पथसंचलन होणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड जिल्हा संघचालक विनोद बन्सल यांनी दिली.
शनिवारी (दि. 21) संभाजी नगर येथे होणाऱ्या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणूनराहुल सोलापूरकर उपस्थित रहाणार असून कार्यक्रम पं. दीनदयाळ उपाध्याय मैदान, पूर्णानगर येथे सायंकाळी 5 वाजता होणार आहे. तर, रविवारी (दि. 22) मुकाई देवी मंदिर समोरील मैदान, मुकाई चौक, किवळे यासह विविध ठिकाणी कार्यक्रम होणार असून देहूरोड, निगडी, चिखली येथे, पिंपळे सौदागर, पिंपळे निलख, काळेवाडी, चिंचवड, रावेत, प्राधिकरण, वाकड, जांबे, थेरगाव फाटा, हिंजवडी, मारुंजी, आळंदी, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी आदी ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. तसेच येत्या 28 ऑक्टोबरला हिंजवडी येथे विजया दशमी उत्सव होणार आहे.